एक रुपयात बोलणे करवून देणारा कॉईन बॉक्स कुणी पाहिला का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:13 AM2021-09-05T04:13:41+5:302021-09-05T04:13:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एक काळ होता, साधारण १५-२० वर्षापूर्वी सधन कुटुंबात, शासकीय नोकरदार वर्गीयांच्या घरी एका विशिष्ट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एक काळ होता, साधारण १५-२० वर्षापूर्वी सधन कुटुंबात, शासकीय नोकरदार वर्गीयांच्या घरी एका विशिष्ट कोपऱ्यात लॅण्डलाईन फोन असायचा. घरातील ही जागा घरी येणाऱ्या आगंतुकाचे लक्ष वेधेल, अशा तऱ्हेने सजवलेली असायची. घरात लॅण्डलाईन फोन असणे, हे अतिशय प्रतिष्ठेचे समजले जायचे. मोबाईलच्या आगमनानंतर प्रतिष्ठेचे समजले जाणारे हे फोन हळूहळू गायब झाले आणि आता केवळ संस्थागत कार्यालयांतच हे फोन आपले अस्तित्त्व जपून आहेत. एवढेच नव्हे तर दूरवर असलेल्या आपल्या नातेवाईकांंशी संवाद साधण्यासाठी एक रुपया टाकून संभाषण करवून देण्यास महत्त्वाचा बिंदू असणारे कॉईन बॉक्स तर अदृष्यच झाले आहेत. हे कॉईन बॉक्स कुठे दिसत असतील तर आजच फोटो काढावा आणि आपल्या सोशल मीडियाच्या वॉलवर अपलोड करावा, कारण तो जवळपास इतिहासजमा झालेला आहे.
नागपूरची लोकसंख्या ३५ ते ४० लाखाच्या घरात आहे आणि प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या हातात, अगदी जर्जर वृद्धाच्या हातात एक मोबाईल असतोच आणि एका कुटुंबात किमान एक तरी ॲण्ड्राईड म्हणा वा स्मार्टफोन आहेच. मोबाईल येण्याच्या आधी साधारणत: २ ते ३ टक्के लोकांच्या घरी लॅण्डलाईन होते. हे लॅण्डलाईन भारत संचार निगम कंपनीचेच होते. आता मात्र, ही संख्या अर्धा टक्काही असेल, याची शाश्वती नाही. विशेष म्हणजे, याबाबतची निश्चित अशी आकडेवारीही सांगता येत नाही. कारण, आता बीएसएनएलसोबतच वेगवेगळ्या कंपन्यांनी मोबाईल फोनसह इन बिल्ट कॉलरआयडी असलेले लॅण्डलाईन फोन उपलब्ध केले आहेत. मात्र, हे लॅण्डलाईन वापरणाऱ्यांची संख्या अगदीच तोकडी आहे. विशेष म्हणजे, अगदी कुठेही म्हणजे कुठेही तुमच्या सोबत मोबाईल राहत असल्याने, एकाच जागी खिळलेला असलेला लॅण्डलाईन फोन वापरायचाच कशाला, अस प्रश्न नागरिक उपस्थित करतात.
१० ते ५ नंतर कटकट नको
आजकाल मोबाईल असल्यामुळे, कुणी कधीही फोन करून माहिती विचारतो. वैयक्तिक आयुष्यातही कार्यालयाची लुडबूड सुरू होऊन जाते. त्यामुळे, लॅण्डलाईन फोन आवर्जुन लावण्यात आलेला आहे. कुणी मोबाईल नंबर मागितला तरी त्यांना कार्यालयाच्या लॅण्डलाईनवरच फोन करा आणि सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेतच फोन करण्यास सांगतो, असे एका संस्थेच्या पदाधिकाऱ्याने या विषयावर बोलताना सांगितले.
मोबाईल असल्यामुळे लॅण्डलाईनचे कनेक्शन कापले
आता प्रत्येकाच्या हाती मोबाईल आहे. प्री-पेड कनेक्शन असल्याने बिल भरण्याचा त्रागा नाही की अधामधात फोन बिघडण्यासाठी तक्रारीची झंझट नाही. आमच्याकडे पाच वर्षापूर्वीपर्यंत लॅण्डलाईन होता. नंतर ते कनेक्शन कापल्याचे श्रीकृष्णनगरातील विनायक देशपांडे यांनी सांगितले.
..............