नागपूर दूरदर्शन कुणी पाहिले का? केबल, सेटटॉप बॉक्सच्या दुनियेत हरवली वाहिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 11:48 AM2020-10-14T11:48:33+5:302020-10-14T11:49:39+5:30
Nagpur Doordarshan नागपूर दूरदर्शन अशा शिर्षकाखाली यावर स्थानिक कार्यक्रमांचे सादरीकरण व्हायचे. आता मात्र ते दिसेनासे झाले आहे.
प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साधारणत: २० वर्षांपूर्वी टीव्ही रसिकांसाठी प्रसारभारतीतर्फे संचालित होणारे दूरदर्शन हाच घरबसल्या मनोरंजनाचा एकमेव पर्याय होता. याच दूरदर्शनवर नागपूरसाठी स्वतंत्र असा एक तासाचा राखीव वेळ होता. नागपूर दूरदर्शन अशा शिर्षकाखाली यावर स्थानिक कार्यक्रमांचे सादरीकरण व्हायचे. आता मात्र ते दिसेनासे झाले आहे.
दूरदर्शनवर शासकीय योजनांसोबतच, प्रत्येक भागातील कलाप्रकारांची माहिती, मनोरंजनात्मक कार्यक्रम सर्वत्र पोहोचवले जातात. मात्र, केबल, सेटटॉप बॉक्सच्या आगमनाने दूरदर्शन शहरी भागातून तरी हद्दपार झाल्याची स्थिती आहे.
त्याच पार्श्वभूमीवर नागपूर दूरदर्शन असा स्वतंत्र प्रकार होता, ही माहितीही आज कुणाला नाही. पूर्वी डीडी १ ही एकच वाहिनी सर्वत्र दिसत होती. महाराष्ट्रात स्वतंत्र अशी सह्याद्री वाहिनी नागरिकांना बघता येत होती. विदर्भात मात्र, डीडी १वरच संध्याकाळपासून मराठी कार्यक्रम बघता येत असे. त्यातही संध्याकाळी ६ ते ७ वाजताचा एक तासाचा वेळ नागपूर दूरदर्शनसाठी राखीव असायचा. या एक तासाचे सर्व संचलन सेमिनरी हिल्स येथील दूरदर्शन केंद्रावरून होत होते. यात कृषी दर्शन, डॉक्टरांशी संवादात्मक कार्यक्रम एखादी मालिका किंवा नाटकाचे सादरीकरण होत असे. सर्व स्थानिक कलावंत, वेगवेगळ्या क्षेत्रातील महनीय व्यक्तींचे कार्य याद्वारे पूर्व विदभार्तील नागरिकांपर्यंत पोहोचत होते. स्थानिक कलावंतांना टीव्हीवर येण्यासाठी हे हक्काचे व्यासपीठ होते. आता मात्र ही वाहिनीच राहिली नसल्याचे स्पष्ट होत आहे.
अँटिना काळ गेला!
पूर्वी अँटिना शिवाय टीव्ही चालत नसे. घरोघरी छतावर अँटिना लागायचे आणि दूरदर्शनचा आस्वाद टीव्हीवर घेता येत होता. आता केबल, सेटटॉप बॉक्स आल्याने घरांवरून अँटिना हद्दपार झाला आहे. अँटिनाशिवाय नागपूर दूरदर्शनचे कार्यक्रम बघता येत नाही. त्याला पर्याय म्हणून आता नागपूर दूरदर्शनचे सगळे उपक्रम सह्याद्री वाहिनीवर प्रसारित केले जात आहेत.
अनेक उपक्रम बंद
नागपूर दूरदर्शनवरील जवळपास सगळेच कार्यक्रम बंद पडले आहेत. सह्याद्री वाहिनीसाठी म्हणून काही कार्यक्रम केले जातात. स्थानिक कलावंतांना त्यात काहीच स्थान नसते. शिवाय नागपूर दूरदर्शनचा लोगोही मिटविण्यात आलेला आहे.
कोरोनामुळे शासकीय निर्देशानुसार कर्मचा?्यांना शिफ्टनुसार बोलविले जात आहे. मात्र, सह्याद्री वाहिनीवर नागपूर दूरदर्शनचे कार्यक्रम प्रसारित होत आहेत. लोगो नसला तरी नागपूर दूरदर्शन म्हणूनच कार्यक्रम दिसतात.
भूपेंद्र तूरकर - उपसंचालक (अभियांत्रिकी), नागपूर दूरदर्शन