'लोकमत नॅशनल मीडिया कॉनक्लेव्ह'; आजच्या माध्यमांच्या भूमिकेवर वरिष्ठ पत्रकारांचे मंथन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 08:51 PM2023-04-02T20:51:14+5:302023-04-02T21:05:10+5:30

लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये वरिष्ठ पत्रकारांनी आजच्या माध्यमांच्या भूमिकेबद्दल परखड शब्दात आपलं मत व्यक्त केलं.

'Has Indian Media Totally Polarized'? senior journalists opinion at Lokmat National Media Conclave' in Nagpur | 'लोकमत नॅशनल मीडिया कॉनक्लेव्ह'; आजच्या माध्यमांच्या भूमिकेवर वरिष्ठ पत्रकारांचे मंथन

'लोकमत नॅशनल मीडिया कॉनक्लेव्ह'; आजच्या माध्यमांच्या भूमिकेवर वरिष्ठ पत्रकारांचे मंथन

googlenewsNext

नागपूर : माध्यम, मीडियाला लोकशाहीचं चौथा स्तंभ म्हटलं जातं. माध्यम स्वतंत्रतेने, निर्भीडतेने समाजातील विविध घटक, घटना, माहिती जनसामान्यपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत असते. परंतु, गेल्या काही काळात मीडियाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याच प्रश्नावरील चर्चेकरीता व त्याद्वारे समाजमनात निर्माण झालेल्या प्रश्नावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात वरिष्ठ पत्रकारांनी आजच्या माध्यमांच्या भूमिकेबद्दल परखड शब्दात आपलं मत माडंलं.

नागपुरच्या रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये दुपारी तीन वाजता या मीडिया कॉनक्लेव्हचे उद्घाटन करण्यात आले. लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. तर, एएनआय अर्थात एशियन न्यूज इंटरनॅशनलच्या संपादक (वृत्त) स्मिता प्रकाश, न्यूज १८ चे व्यवस्थापकीय संपादक अमिश देवगण, एबीपीचे राष्ट्रीय संपादक विकास भदौरिया, पंजाब केसरी व नवोदया टाइम्सचे कार्यकारी संपादक अकु श्रीवास्तव, लोकमत मीडिया ग्रुपचे समूह संपादक विजय बाविस्कर, राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे, ज्येष्ठ पत्रकार व लोकमत समाचारचे पहिले संपादक एस. एन. विनोद, हिंदुस्थान टाइम्सचे सहयोगी संपादक प्रदीप मैत्र, एबीपी माझाच्या उप-कार्यकारी संपादक सरिता कौशिक, न्यूज १८ लोकमतचे संपादक आशुतोष पाटील आदि देशातील वरिष्ठ पत्रकार सहभागी झाले होते. 

माध्यमे समाजाचा आरसा, परंतु हा आरसा साफ ठेवणे पत्रकारांची जबाबदारी - अनुराग सिंह ठाकूर

जे विकू शकेल तीच बातमी आहे असं माध्यमांच्या कार्यालयात म्हटलं जाते. याला जबाबदार कोण? माध्यमांमध्ये अनेक उद्योगपतींचा पैसा लागलाय त्यामुळे हे असू शकते. आता या आव्हानांमधून बाहेर पडण्याचं काम पत्रकारांना करावे लागणार आहे. नव्या आव्हानात गुण-दोष दोन्ही पाहायला हवेत असं मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं.

 परदेशी माध्यमे भारताची विकसित देशाकडे होणारी वाटचाल रोखण्याचा प्रयत्न करतंय. कुणी असा प्रपोगेंडा बनवत आहे का? मोदींच्या नेतृत्वात जगात आर्थिकदृष्ट्या ५ व्या नंबरवर भारत आहे हे अन्य कुणाला बघवत नाही. भारताने कोरोना लस उत्पादित कशी केली? ६० कोटी लोकांना वर्षाला आरोग्य सुविधा मोफत कशी दिली जाते? डिजिटल युगाकडे भारत जातोय. हे सत्य आहे जे काही देशांना पाहावत नाही. जे सत्य आहे ते समोर येणारच आहे. यामागे नेमकं काय चाललंय हे समजून घ्यायला हवं असं मंत्री अनुराग ठाकूर यांनी मांडले. 

दुषित दृष्टीनं जे पाहू ते दुषितच दिसते'- सुधीर मुनगंटीवार

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, भारतीय मीडियाचं ध्रुवीकरण झाले का या विषयावर बोलताना 'नाही! या देशात मीडियाचं ध्रुवीकरण होऊ शकत नाही व होणारही नाही असे मत व्यक्त केले. ध्रुवीकरण म्हणजे आपल्या विचारांची बाब आहे. पत्रकारिता करताना दुषित दृष्टीचे परिणाम आपल्याला सत्याची बाजू मांडायला अडसर ठरते. पत्रकारिता करताना पत्राकाराची संबंधित विषयाबाबतची दृष्टी महत्वाची असून ती राष्ट्राच्या हिताची असावी मत त्यांनी व्यक्त केलं.

विचारांची लढाई हा लोकशाहीचा सर्वात मोठा कणा - राहुल पांडे

माध्यमांचे धुव्रीकरण आपण बोलतोय पण समाजाचं धुव्रीकरण झाले असेल तर त्याचे प्रतिबिंब माध्यमांमध्ये दिसते. माध्यमे हा समाजाचा आरसा आहेत. बोटचेपी धोरण, गोलमेज भाषा वापरायची का हा प्रश्न आहे. १९४७ ते आज आपण स्वातंत्र्याचं ७५ वा अमृत महोत्सव साजरा करतोय. या कालावधीत माध्यमात धुव्रीकरण राहणारच आहेत. समाजात राजकीय, आर्थिक, सामाजिक या विषयांवर वेगवेगळे विचार असणार आहेत. विचारांची लढाई हा लोकशाहीचा सर्वात मोठा कणा आहे असं मत राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी मांडले. 

आजच्या काळात आणीबाणीचा काळ आठवण गरजेचं - अकु श्रीवास्तव

 आजच्या काळात आणीबाणीचा काळ आठवण गरजेचं आहे. कारण, आजच्या चर्चेचा विषय आहे की, माध्यमाचं धुव्रीकरण झालंय का? याचाच अर्थ देशातील लोकशाही जिवंत आहे की नाही, असेही कोणीतरी म्हणू शकते. मात्र, परिस्थिती आज तशी नाही. आपण जो अनुभव घेतलाय, गेल्या ६० ते ७० वर्षात त्यात निश्चित बदल झालाय. आम्ही जेव्हा रेशनच्या दुकानात जात होतो, तेव्हा तो दुकानदारही भल्यामोठ्या रांगतून हाकलून देत होता. तिथं स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि इतरही लोकं गप्प बसत होते, तिथे पत्रकार तरी काय आवाज उठवणार?, असे म्हणत आज पत्रकारितेतून आवाज बुलंद झालाय, असे अकु श्रीवास्तव यांनी म्हटले. 

Web Title: 'Has Indian Media Totally Polarized'? senior journalists opinion at Lokmat National Media Conclave' in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.