घराशेजारी डबके तर साचले नाही ना? प्लेटलेटची मागणी वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2022 07:48 PM2022-09-13T19:48:10+5:302022-09-13T19:48:42+5:30
Nagpur News सध्या पाऊस लांबल्याने विषाणूजन्य आजारांसोबतच डासांमार्फत होणाऱ्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे रक्तासोबत प्लेटलेटची मागणी वाढली आहे.
नागपूर : कॅन्सर, डेंग्यू, मलेरिया आदी रोगांमध्ये शरीरातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होते आणि रुग्णाच्या जीविताला धोका निर्माण होतो. सध्या पाऊस लांबल्याने विषाणूजन्य आजारांसोबतच डासांमार्फत होणाऱ्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे रक्तासोबत प्लेटलेटची मागणी वाढली आहे.
परतीच्या पावसामुळे जागोजागी पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. डेंग्यू वाढत असताना डेंग्यूसदृश्य आजाराच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. या आजारात प्लेटलेट्स कमी होतात. गेल्या १० दिवसांपासून प्लेटलेट्सच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे. खासगी रक्तपेढ्यांमध्ये पूर्वी दिवसाला २० ते २५ रुग्णांसाठी प्लेटलेट्सची मागणी होत होती, ती वाढून आता ५०वर गेली आहे.
- ‘सिंगल डोनर प्लेटलेट्स’च्या मागणीत दुपटीने वाढ
शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला ‘थ्रोम्बोसायटोपोनिया’ असे म्हणतात. जेव्हा ‘प्लेटलेट्स काऊंट १५० हजार प्रति मायक्रोलिटरपेक्षा खाली येतात तेव्हा त्याला ‘लो प्लेटलेट्स’ मानले जाते. अशावेळी रुग्णाला ‘रँडम डोनर प्लेटलेट्स’ म्हणजे अनेक रक्तदात्यांच्या रक्तातून एकत्र केलेल्या प्लेटलेट्स दिल्या जातात. परंतु काही रुग्णांमध्ये या प्लेटलेट्समधून आवश्यक संख्या वाढत नाही, यामुळे त्यांना ‘सिंगल डोनर प्लेटलेट्स’ म्हणजे एकाच रक्तदात्याच्या रक्तातून दिलेल्या प्लेटलेट्स दिल्या जातात. सध्या या प्लेटलेट्सच्या मागणीतही दुपटीने वाढ झाल्याचे रक्तपेढ्यांचे म्हणणे आहे.
- शासकीय रक्तपेढीही अडचणीत
डागा या शासकीय रक्तपेढीत रक्तातून प्लेटलेट स्वतंत्र काढण्याची यंत्रणा नाही. यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना प्लेटलेटसाठी मेयो, मेडिकल किंवा खासगी रक्तपेढ्यांकडे धाव घ्यावी लागते. खासगीमध्ये याची किंमत गरीब रुग्णांना परवडणारी नसल्याने मेयो, मेडिकलवरच अनेकांची भिस्त आहे. विशेष म्हणजे प्लेटलेट्सची गरज इतरही रुग्णांना असल्याने या रक्तपेढ्या अडचणीत आल्या आहेत.
- प्लेटलेट्सच्या मागणीत दुपटीने वाढ
पूर्वी दिवसाला साधारण २० ते २५ प्लेटलेट्स पिशव्यांची मागणी व्हायची, परंतु आता ही संख्या ५०च्या वर गेली आहे. सध्या मागणीत अचानक झालेली वाढ हे डेंग्यूचे निदर्शक आहे. यामुळे रक्तासाेबतच ‘प्लेटलेट्स’ही दान करा.
- डॉ. हरीश वरभे, संचालक, लाईफ लाईन रक्तपेढी
- स्वयंस्फूर्तीने रक्तदान करा
प्लेटलेट्सच्या मागणीत तीन पटीने वाढ झाली आहे. रक्तपेढीतर्फे ठरलेल्या रक्तदात्यांना प्लेटलेट्स दान करण्याची विनंती केली जात आहे. परंतु रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान किंवा प्लेटलेट्स दान केल्यास रुग्ण अडचणीत येण्याची वेळ टळू शकते.
- अशोक पत्की, हेडगेवार रक्तपेढी