अवैध अतिक्रमणावर हतोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 01:50 AM2017-10-27T01:50:41+5:302017-10-27T01:51:49+5:30
महापालिका व नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकांची गुुरुवारी दिवसभर धावपळ सुरू होती. शहराच्या विविध भागातील अतिक्रमण हटविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका व नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकांची गुुरुवारी दिवसभर धावपळ सुरू होती. शहराच्या विविध भागातील अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलल्याने नासुप्रच्या पथकाला अंबाझरी मार्गावरील विद्यापीठाच्या जागेवरील अतिक्रमण न काढताच परतावे लागले.
असाच प्रकार बगडगंज येथे घडल्याने गुुरुवारी पथकाची चांगलीच धावपळ झाली.
शहरातील चौक व रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त असल्याने, गेल्या दोन दिवसापासून लोकमतने अतिक्रमण विरोधात मोहीम हाती घेतली आहे. चौक व रस्त्यांवरील अतिक्र मणाचे वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. याची दखल घेत महापालिका व नासुप्रने अतिक्रमणाविरोधात मोहीम सुरू केली आहे.
महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक गांधीबाग येथील तीन नल चौकातील संत गुरुसिंह कापड दुकानाच्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम पाडण्यासाठी पोहचले होते. तिथे परवानगी न घेता तिसºया व चौथ्या मजल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. पथक पोहचताच जागा मालकांनी बांधकाम नकाशा मंजुरीसाठी महापालिकेकडे अपील केल्याची माहिती दिली. त्यामुळे पथकाचा खर्च म्हणून ९० हजार रुपये वसूल करून पथक परतले.
त्यानंतर पथक जुना बगडगंज येथील रॉयल प्लाझा अपार्टमेंट येथे पोहचले. बिल्डरने अतिरिक्त बांधकाम केले आहे. परंतु फ्लॅटधारकांना याची माहिती नव्हती. त्यांनी यासंदर्भात नगरविकास विभागाकडे अपील दाखल केल्याची माहिती देण्यात आली. प्रकरण प्रलंबित असल्याने ४० हजार रुपये शुल्क वसूल करून पथक परतले. आसीनगर झोनच्या पथकाने महेंद्रनगर भागातील अतिक्रमण हटविले तसेच रामनगर भागातील अतिक्रमण करून उभारण्यात आलेले शेड तोडण्यात आले.