हत्तीराेग रुग्णांचा पायधुनी कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:09 AM2021-01-18T04:09:14+5:302021-01-18T04:09:14+5:30
खापरखेडा : मकर संक्रांतीनिमित्त ज्येष्ठांचे पाय धुवून त्यांचे आशीर्वाद घेण्याची ग्रामीण भागात प्रथा आहे. हत्तीराेग रुग्णांंच्या पाय किंवा हाताला ...
खापरखेडा : मकर संक्रांतीनिमित्त ज्येष्ठांचे पाय धुवून त्यांचे आशीर्वाद घेण्याची ग्रामीण भागात प्रथा आहे. हत्तीराेग रुग्णांंच्या पाय किंवा हाताला माेठ्या प्रमाणात सूज येत असल्याने समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकाेन थाेडा वेगळा असताे. त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी, म्हणून चिचाेली (खापरखेडा, ता. सावनेर) येथील प्राथमिक आराेग्य केंद्राच्यावतीने खापरखेडा येथे हत्तीराेग रुग्णांच्या पायधुनी या अभिनव कार्यक्रमाचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते.
यावेळी राष्ट्रीय हत्तीराेग नियंत्रण पथक, नागपूर व उपपथक पाटणसावंगी (ता. सावनेर) यांच्यावतीने नागरिकांना या आजाराबाबत विस्तृत माहिती देण्यात आली. हा आजार डासांमुळे हाेत असून, हात किंवा पाय विद्रुप हाेतात. हा शरिराचे अवयव अकार्यक्षम करणारा आजार आहे. या आजारामुळे शरिराच्या अवयवाच्या विकृतीचे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत तज्ज्ञांद्वारे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यात हत्तीराेग रुग्णांचे प्रशिक्षण, त्यावरील औषधाेपचार, शारीरिक व्यायाम यासह अन्य महत्त्वाच्या बाबींची माहिती देण्यात आली. हत्तीरोग अधिकारी मोनिका चारमोडे, डॉ. भाग्यश्री त्रिवेदी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री पेटकर, डॉ. ऋचा वाघ यांनी हत्तीराेग रुग्णांना आलेल्या विकृतीची निगा कशी राखावी, याबाबत माहिती दिली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी हत्तीरोग रुग्णांचे पाय धुऊन स्वच्छतेचे प्रात्यक्षिक करून दाखवले. या कार्यक्रमात राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण पथकातील आरोग्य पर्यवेक्षक देशपांडे, चौबे, महल्ले, भिवसेनकर, राठोड, फुगे यांच्यासह नागरिक, रुग्ण व रुग्णांचे कुटुंबीय उपस्थित हाेते.