एका दशकात अनेक स्थित्यंतरे अनुभवली

By admin | Published: November 12, 2014 12:55 AM2014-11-12T00:55:48+5:302014-11-12T00:55:48+5:30

पदवीनंतर हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला. लगेच चंदीगडला एका मोठ्या हॉटेलमध्ये सहायक महाव्यवस्थापक (एजीएम) म्हणून नोकरी मिळाली. ज्या कस्तुरबानगरात वाढले,

Have experienced many transitions in a decade | एका दशकात अनेक स्थित्यंतरे अनुभवली

एका दशकात अनेक स्थित्यंतरे अनुभवली

Next

उषा नारायणे यांनी मांडले अनुभव : अनेक पैलू उघड
नागपूर : पदवीनंतर हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला. लगेच चंदीगडला एका मोठ्या हॉटेलमध्ये सहायक महाव्यवस्थापक (एजीएम) म्हणून नोकरी मिळाली. ज्या कस्तुरबानगरात वाढले, शिकले, तेथील अत्याचाराची माहिती असल्यामुळे तसल्या वातावरणात आई-वडिलांना ठेवायचे नाही, असा आधीच निर्णय घेतला होता. त्यामुळे सुट्या मिळताच आई-वडिलांना घेण्यासाठी मी नागपुरात आले. आॅगस्टचा पहिलाच आठवडा होता. आई-वडिलांसोबतच कस्तुरबानगरातील मैत्रिणी, शेजारी महिला यांच्याकडून अक्कू आणि त्याच्या गुंडांच्या अत्याचारांचे किस्से कळले. प्रचंड किळसवाणेच होते सारे! त्याने महिला, मुलींचे जणू स्वातंत्र्यच हिरावून घेतले होते. एकट्याच काय, महिला-मुली घोळक्यानेदेखील कस्तुरबानगरात फिरू शकत नव्हत्या. येथे असताना रोजच कोणत्या ना कोणत्या महिला, मुलीवर अत्याचार होत असल्याची चर्चा कानी पडत होती. आक्रोश वाढतच होता. पोलिसांच्या नेभळट भूमिकेमुळे अत्याचारित, पीडित कुटुंबांचे आक्रंदन तीव्र होत होते. एक परिवार नव्हे, अवघे कस्तुरबानगरच पेटून उठले होते. अखेर जनभावनांचा भडका उडालाच. १३ आॅगस्टला क्रूर अक्कूची हत्या करून, त्याच्या अत्याचारापासून संतप्त जमावाने स्वत:ची सुटका करून घेतली.
अन् सुरू झाला संघर्ष
एका राक्षसाच्या तावडीतून सुटल्याचा आनंद क्षणिकच होता; नंतर मागे लागला पोलिसांचा ससेमिरा. पोलीस ठाण्याच्या येरझारा आणि कोर्टाच्या तारखा साऱ्यांनाच अस्वस्थ करणाऱ्या होत्या.
माझ्या परिवाराची स्थिती चांगली होती. मात्र माझे शेजारी, सहकारी रोजच भाजीभाकरीसाठी संघर्ष करणारे होते. त्यामुळे त्यांना, आम्हाला आता दुहेरी संघर्ष करावा लागत होता. पोलीस ठाणे, कोर्टाची तारीख म्हटले की दिवस जाणार. अर्थात त्या दिवशी कामाला सुटी. कामावर गेले नाही तर खायचे काय, असा प्रश्न होता. त्यात मायबाप कोर्टात अन् छोटी मुलेही तिकडेच. त्यामुळे शिक्षणावरही विपरीत परिणाम होऊ लागला.
हांडा यांची मदत मोलाची
अक्कूच्या हत्येनंतर सहानुभूती दाखविणारे हजारो जण होते. मात्र, त्यांनी केवळ नाव आणि फोटो छापून घेण्यापर्यंतच हजेरी लावली. या प्रकरणाशी जुळलेल्यांना पाच पैशाची कुणी मदत केली नाही. कुणी दोनवेळचे जेवण पुरविले नाही किंवा रोजगारासाठी प्रयत्न केले नाही. दिल्ली येथील सुधीर हांडा आणि श्याम लॉन फाऊंडेशनची खूप मदत झाली. त्यांनी कस्तुरबानगरातील दु:ख जाणले. जखमेवर फुंकरही घातली.
येथील महिला-मुली-तरुणांना रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले. ते देतानाच महिन्याला विद्यावेतनही (स्टायपंडही) दिले. तब्बल दहा वर्षांपासून त्यांची नियमित मदत होते. ते कस्तुरबानगरातील गोरगरिबांसाठी देवापेक्षा कमी नाही. त्यांच्यानंतर अ‍ॅड. आर. के. तिवारी यांचीही मदत झाली.
आता सर्वांनाच सावरायचे आहे
झाले गेले पार पडले. आता या सर्वांना सावरायचे आहे. दर्जेदार शिक्षण मिळाले तरच भविष्य सुकर होऊ शकते. त्यामुळे सुदामनगरीतील गोरगरिबांना, त्यांच्या मुलांना आता सावरायचे आहे. त्यांना तयार व्हायचे आहे. कारण पुढेही प्रतिष्ठेचा संघर्ष करावा लागणार आहे.
मतलबी स्थानिक नेते
नेते किती ढोंगी आणि मतलबी असतात, त्यांचाही अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतला. अपवाद वगळता नागपुरातील कोणत्याही मोठ्या नेत्याने अक्कू पीडितांसाठी कोणतीही उल्लेखनीय मदत केली नाही. उलट त्यांनीच निवडणुकीच्या वेळी अक्कूकांडांशी संबंधितांकडे मतांसाठी हात पसरले.
गिरिजाशंकर व्यास,
गोपीनाथ मुंडेंची मदत
या प्रकरणात एकीकडे स्थानिक नेत्यांचा मतलबीपणाचा अनुभव आला असताना, गिरिजाशंकर व्यास आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मदतीचीही आठवण होते. या दोन्ही नेत्यांचा तसा आमच्याशी अर्थाअर्थी कसलाही संबंध नव्हता. मात्र, ते आम्हाला भेटले. त्यांनी आस्थेने विचारपूस केली. अन् प्रत्येक ाच्या हातात पाच हजारांची मदत ठेवली. पाच रुपयांसाठी मोताद असलेल्यांना ही रक्कम त्यावेळी पाच लाखांसारखीच होती. त्याहीपेक्षा मोठेपणा हा की, या नेत्यांनी या मदतीचा उल्लेख कुठे करू नका, असे आम्हाला सांगितले होते. त्यांनी तेव्हा दिलेला धीर आजही आम्हाला ‘ते’ आमच्या पाठीशी असल्याची जाणीव करून देतो. (प्रतिनिधी)
उषा मधुकर नारायणे (उषा आशिषकुमार पोद्दार). अक्कू हत्याकांडाशी जुळलेले एक महत्त्वपूर्ण नाव. लठ्ठ पगाराच्या नोकरीवरून सुटीवर आलेली उषा या प्रकरणात अशी गुंतली की नंतर तिचे विश्वच बदलले. दहा वर्षांत उषाने अनेक स्थित्यंतरे बघितली. अनेकांचे कडू-गोड अनुभव तिच्या वाट्याला आले. सोमवारी या प्रकरणाचा निकाल लागल्यापासून ‘मीडिया’च्या गराड्यात आलेली उषा आज लोकमतशी भरभरून बोलली. तिच्याच शब्दात...

Web Title: Have experienced many transitions in a decade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.