जन्मानंतर तीन आठवड्यात बाळाच्या डोळ्यांची तपासणी केली का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2023 08:03 PM2023-06-08T20:03:48+5:302023-06-08T20:04:20+5:30

Nagpur News बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या तीन ते चार आठवड्यात डोळ्यांची तपासणी करून उपचार घेतल्यास कायम अंधत्वाचा धोका टळू शकतो.

Have the baby's eyes been checked at three weeks after birth? | जन्मानंतर तीन आठवड्यात बाळाच्या डोळ्यांची तपासणी केली का?

जन्मानंतर तीन आठवड्यात बाळाच्या डोळ्यांची तपासणी केली का?

googlenewsNext

नागपूर : दोन किलोपेक्षा कमी वजनाच्या आणि मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांमध्ये आढळून येणारा ‘रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी’ (आरओपी) आजार जनजागृतीमुळे वाढत आहे. बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या तीन ते चार आठवड्यात डोळ्यांची तपासणी करून उपचार घेतल्यास कायम अंधत्वाचा धोका टळू शकतो. भारत सरकारने ‘३० दिन रोशनी के’ या घोषवाक्यातून जन्मानंतर बाळाच्या डोळ्याची तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.

- काय आहे ‘आरओपी ’

मुदतपूर्व जन्मल्यामुळे किंवा कमी वजनाच्या बाळाच्या डोळ्यांच्या अंत:पटलावरील रक्तवाहिन्यांची वाढ अपूर्ण असते. अशा परिस्थितीत बाळ आजारी पडल्यास त्याला ‘आरओपी’ हा आजार होण्याची शक्यता असते. या आजारामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते. यामुळे अंधत्व आल्यास त्यावर कोणताही उपचार करता येत नाही. योग्य वेळी तपासणी करून उपचार घेतल्यास सर्व बालकांना अंधत्वापासून वाचवता येऊ शकते.

- अकाली जन्मलेल्यांमध्ये ‘आरओपी’चे प्रमाण ३० टक्क्यांवर

वरिष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत बावनकुळे यांनी सांगितले, अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये ‘आरओपी’चे प्रमाण जवळपास ३० ते ४० टक्के असते. त्यापैकी १५ ते २० टक्के बाळांना उपचारांची गरज असते.

- भारतात दरवर्षी सहा ते आठ हजार बालकांना अंधत्व

भारतात दरवर्षी २ लाख बालके अकाली (प्री-टर्म) जन्माला येतात. यापैकी ३० ते ४० हजार अर्भकांची तपासणी होते. जागरुकता आणि तपासणीच्या अभावामुळे दरवर्षी सहा ते आठ हजार बालकांना ‘आरओपी’मुळे अंधत्व येते.

- या बालकांनाही तपासणीची गरज

३४ आठवड्यांपूर्वी जन्माला आलेल्या किंवा दोन किलोग्रॅमपेक्षा कमी वजन असलेल्या सर्व बाळांची तपासणी करणे गरजेचे आहे. याशिवाय, ऑक्सिजनची कमी, रक्त संक्रमण, सेप्सिस (संसर्ग), श्वासोच्छवासाचा त्रास, जन्मानंतर कमी वजन वाढणे, अशा बाळांना देखील ‘आरओपी’चा धोका असतो.

- लक्षणे काय?

‘आरओपी’ या नेत्रविकारात लक्षणे दिसून येत नाहीत. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये बाह्य डोळा पूर्णपणे सामान्य दिसतो. त्यामुळे अनेक पालक तपासणी आणि उपचारांना नकार देतात. आजार बळावल्यानंतरच डॉक्टरांकडे जातात, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

- बालकांमध्ये अंधत्व आणणारा आजार

बालकांना ‘आरओपी’ होण्यापासून वाचविण्यासाठी वेळीच उपचार महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी सरकारने ‘३० दिन रोशनी के’ ही मोहीम हाती घेतली आहे. या आजाराचं निदान करण्यासाठी रेटिनाची विशेष तपासणी प्रशिक्षित तज्ज्ञांकडून करावी लागते. मूल एक महिन्याचे होण्याआधी ही तपासणी करून घेणे आवश्यक असते.

- डॉ. प्रशांत बावनकुळे, ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ

Web Title: Have the baby's eyes been checked at three weeks after birth?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य