तुमचे वीज बिल चेक केले का? जूनमध्ये ३० टक्क्यांपर्यंत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 09:15 AM2024-06-28T09:15:03+5:302024-06-28T09:15:08+5:30
नवीन दर, फिक्स्ड चार्ज, व्हीलिंग चार्ज, एफएसीचा फटका
कमल शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : जून महिन्यातील भरमसाट वीज बिलांमुळे खळबळ उडाली आहे. बिलात वीस ते तीस टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे लोक चिंतेत आहेत. बिल घेऊन लोक महावितरण कार्यालयावर जात आहेत. अधिकारी हतबल आहेत, तर लोकांचा नाइलाज आहे. त्यांना बिल भरावेच लागेल अन्यथा वीज कापली जाईल. महावितरणने पाठवलेल्या बिलात इंधन समायोजन शुल्क आकारले जात आहे. वीज संकटाच्या काळात खरेदी केलेल्या अतिरिक्त विजेपोटी हे शुल्क आकारले जाते. हे शुल्क ग्राहकांच्या बिलात प्रति युनिट आकारण्यात आले आहे. १०० युनिटपर्यंतच्या वापरासाठी ४० पैसे, १०१ ते ३०० युनिटसाठी ७० पैसे, ३०१ ते ५०० युनिटसाठी ९५ पैसे व त्यापेक्षा जास्त वापरासाठी १.०५ रुपये प्रति युनिट. या शुल्काच्या नावावर प्रति युनिट वसुली करण्यात आली आहे.
श्रेणी बदलताच दर वाढतो
- १०० युनिट्सपर्यंत ४.७१ रुपये वीज दर आहे; परंतु १०१ युनिटपासून ते ३०० युनिटपर्यंत प्रत्येक युनिटसाठी १०.२९ रुपये द्यावे लागतात. म्हणजेच श्रेणी बदलल्याबरोबर ५.५८ रुपयांची वाढ.
- ३०१ ते ५०० युनिट्सचा दर १४.५५ रुपये प्रति युनिट आहे. मागील श्रेणीच्या तुलनेत ४.२६ रुपये अधिक आहे.
शहरांत फिक्स्ड चार्ज वाढले
१ एप्रिलपासून शहरी भागातही फिक्स्ड चार्जमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता सिंगल फेज कनेक्शनसाठी हे शुल्क ११६ रुपयांवरून १२८ रुपये करण्यात आले आहे. तीन फेज कनेक्शनसाठी ३८४ रुपयांऐवजी ४२४ रुपये वसूल केले जात आहे. महापालिका क्षेत्रात १० रुपयांचा अतिरिक्त फिक्स्ड चार्जसुद्धा वसूल केला जात आहे.
१.१७ रुपये प्रति युनिटचा चार्ज
१ एप्रिलपासून नवीन वीज दर लागू झाले. ही वाढ सुमारे पाच टक्के असल्याचा महावितरणचा दावा आहे; परंतु इतर शुल्क जोडल्यास ही वाढ ९.८६ टक्क्यांवरून १०.४२ टक्क्यांपर्यंत पोहोचते. याशिवाय प्रत्येक युनिटवर १.१७ रुपये व्हीलिंग चार्ज आकारला जात आहे.