पंचाळा येथे कोरोनाचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:07 AM2021-04-10T04:07:55+5:302021-04-10T04:07:55+5:30
रामटेक : रामटेक तालुक्यातील पंचाळा (बु.) या गावी कोरोनाचा विस्फोेट झाला आहे. हजार लोकवस्तीचे हे गाव आहे. ...
रामटेक : रामटेक तालुक्यातील पंचाळा (बु.) या गावी कोरोनाचा विस्फोेट झाला आहे. हजार लोकवस्तीचे हे गाव आहे. येथे आतापर्यंत ६० नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत १० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पंचाळा (बु.) येथे एका कुटुंबात लग्नसोहळा होता. त्यात कोरोनाचा प्रार्दुभाव झाला. त्यानंतर सतत वाढ होत गेली. यानंतर गावात होळी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला. त्यामुळे संक्रमण अधिक वाढले. याबाबत प्रशासनानेही दखल घेतली. उपजिल्हाधिकारी बडे यांनी पंचाळा (बु.) येथे अलीकडेच भेट दिली. त्यांच्यासोबत तहसीलदार बाळासाहेब मस्के, वैद्यकीय अधिकारी मेहरकुळे, नायब तहसीलदार कोहळे, सरपंच माटे उपस्थित होते. नागरिकांनी त्यांना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी व्यवस्था करण्याची मागणी केली. रामटेकला एका हॉस्पिटलमध्ये उपचाराची व्यवस्था आहे. पण वेळेवर पैसे कुठून भरणार, हा प्रश्न आहे. सरकारी दवाखान्यात ऑक्सिजन व व्हेंटीलेटरची व्यवस्था आवश्यक आहे. अचानक रुग्णाचे ऑक्सिजन कमी होते. योग्य उपचाराअभावी बाधितांचा मृत्यू होत असल्याने तालुकास्तरावर सरकारी हॉस्पिटल सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली. अधिकाऱ्यांनी मात्र केवळ आढावा घेतला व सूचना केल्या. ग्रामीण भागात कोरोना रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. शहरामध्ये सगळे बंद केले जाते, पण खेड्यात मात्र असे काहीही बंधन नाही. सुरुवातीला रुग्ण शाळेमध्ये क्वारंटाईन केले जात होते. पण आता रुग्ण घरीच असतात. इकडेतिकडे भटकत असतात. त्यांना रोखणारे कुणी नाही. त्यामुळे गावात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातसुद्धा कडक निर्बंध लावणे आवश्यक आहे.