वादळी पावसाने हाहाकार! तीन तासात मदतीसाठी ४२ कॉल; अग्निशमन विभागाचे रात्रभर मदतकार्य
By गणेश हुड | Published: April 21, 2023 03:00 PM2023-04-21T15:00:06+5:302023-04-21T15:02:46+5:30
वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे ३७ झाडे पडली
नागपूर : उपराजधानीत गुरुवारी सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेदरम्यान वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने शहरात ठिकठिकाणी ३७ झाडे पडली. सदर भागातील जेपी हाइट्स इमारतीची संरक्षण भिंत झोपडीवर पडल्याने माय-लेकाचा मृत्यू झाला. तर बाप-लेक जखमी झाले. अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. विजेअभावी अनेक अपार्टमेंटला पाणी संपले, तीन तासातच मदतीसाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे तब्बल ४२ कॉल आले. यामुळे अग्निशमन विभागाच्या जवानांची चांगलीच तारांबळ उडाली.
वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे शहरातील काही वर्दळीच्या रस्त्यावर झाडे पडल्याने रहदारी विस्कळीत झाली होती. एकाच वेळी ३० ठिकाणी झाडे पडग्ली. कुठे रस्त्यावर तर कुठे घरावर झाड पडले. अग्निशमन विभागाच्या जवानांनी रात्रभर पडलेली झाडे कापून हटविण्याचे काम केले. शुक्रवारी सकाळपर्यंत मतदकार्य सुरू होते. यामुळे विभागातील कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली.
वादळाचा तडाखा! भिंतींच्या ढिगाऱ्यात दबून मायलेकाचा मृत्यू
झाडे पडल्याची ठिकाणे
जसवंत टॉकीज जवळ, गोळीबार चौक, गिट्टीखदान ले-आऊट प्रतापनगर, मीनीमातानगर, लक्ष्मीनगर पोस्ट ऑफिस जवळ, साईकृपा ट्रेडर्स कावेरी गोदावरी बिल्डिंग, छत्रपती चौक पेट्रोल पंप समोर, रामगर मद्रासी मंदीर सरस्वती अपार्टमेंट, शंकर नगर प्लॉट क्रमांक १४, बर्डी बिग बाजार जवळ,खामला चौक, कपील नगर बौध्द विहार, हल्दीराम हॉटेल अजनी चौक, म्हाळगीनगर चौक, रघुजीनगर, श्रीनगर नरेंद्र नगर, देवनगर चौक, लाकडी पूल आयाचित मंदीर, सुरेंद्र नगर, वसंत नगर, अभ्यंकर नगर, वर्धा ले-आऊट अंबाझरी तलाव, लक्ष्मीनगर अभिनव कॉलनी, सावरकर नगर, साक्षी नेत्रालय राजीव नगर, रामबाग आनंद बुध्द विहार जवळ, आठ रस्ता चौक, आकाशवाणी चौकाजवळ, गिट्टीखदान ले-आऊट, अशोक चौक शितला माता मंदीराजवळ, शताब्दी नगर रिंग रोड, रामनगर मंदीराजवळ, प्रतापनगर, शिव अपार्टमेंट, कोतवाल नगर, प्रेमनगर.