‘सायको’चा सोशल प्लॅटफॉर्मवर हैदोस; महिला, मुलींचा छळ; पोलीस हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 08:33 AM2021-05-30T08:33:37+5:302021-05-30T08:33:58+5:30
Nagpur News गुजरातमध्ये राहणाऱ्या या आरोपीने एक-दोन नव्हे, तर अनेक महिला, मुलींचे जगणे मुश्कील करून सोडले आहे. त्याच्यावर कारवाईसाठी सरसावलेल्या स्थानिक पोलिसांना आरोपी ‘अल्पवयीन’ असल्याचे गुजरात पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका विकृत प्रवृत्तीने महिला, मुलींबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषेचा वापर करून सोशल प्लॅटफॉर्मवर त्यांची बदनामी चालविली आहे. गुजरातमध्ये राहणाऱ्या या आरोपीने एक-दोन नव्हे, तर अनेक महिला, मुलींचे जगणे मुश्कील करून सोडले आहे. त्याच्यावर कारवाईसाठी सरसावलेल्या स्थानिक पोलिसांना आरोपी ‘अल्पवयीन’ असल्याचे गुजरात पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या विकृतीला कसा आळा घालावा, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. संबंधितांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा कथित अल्पवयीन आरोपी
सोशल प्लॅटफॉर्मवर शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थिनींसोबत मैत्री करतो. नंतर त्यांच्याशी सलग ऑनलाइन संपर्कात राहून घाणेरड्या भाषेचा वापर करतो. मुलींनी त्याला आक्षेप घेतला किंवा ब्लॉक केले तर तिच्या आणि स्वतःच्या नावाने फेक प्रोफाइल तयार करतो. त्यानंतर तिच्या इन्स्टाग्राम, फेसबुकवरील फ्रेंडलिस्टमध्ये असलेल्यांना, तसेच तिच्या नातेवाईक महिला, मुलींना अत्यंत आक्षेपार्ह मेसेज पाठवितो. व्हिडिओ कॉलही करतो. त्याचा हा विकृतपणा अनेकींना प्रचंड मनस्ताप देत आहे. त्याचा विक्षिप्तपणा लक्षात घेऊन त्याला ब्लॉक केले, तर हा सायको नंतर दुसऱ्या (फेक) प्रोफाइलवरून पीडितेच्या फ्रेंडलिस्टमधील मित्र-मैत्रिणींना आक्षेपार्ह मेसेज पाठवितो. त्याची विकृती सहन करण्यापलीकडची असल्याने अनेकींनी त्याच्याविरुद्ध शहर पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे.
माफीनामा अन् उपद्रव
तीन महिन्यांपासून महिला, मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड मानसिक त्रास देणाऱ्या या विकृत व्यक्तीचा कपिलनगर पोलिसांनी पत्ता शोधला. तो गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील रहिवासी आहे. गुजरात आणि नागपुरात कोरोनाचा कहर असल्यामुळे प्रत्यक्ष तेथे जाण्याऐवजी तेथील पोलीस अधिकाऱ्यांना या गंभीर प्रकाराची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. त्यामुळे खेडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत तो १६ वर्षांचा अर्थात अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी तेथील पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्याला समज दिली. त्याच्याकडून मोबाइल आणि वेगवेगळे सीमकार्डही ताब्यात घेण्यात आले. ‘आता माफ करा, यापुढे असे काही करणार नाही,’ असा पोलिसांपुढे माफीनामा देणाऱ्या या व्यक्तीने आपला उपद्रव सुरूच ठेवला आहे. वेगळे सीमकार्ड आणि मोबाइल वापरून तो पीडित मुली आणि त्यांच्या कुटुंबातील महिलांची बदनामी करीत आहे. त्यामुळे आता त्याचे कसे करावे, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
न्यायालयाचा मार्ग
आरोपी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी न्यायालयात धाव घेत त्याच्या उपद्रवाची माहिती देऊन त्याच्याविरुद्ध कोणत्या स्वरूपाची कारवाई करावी, त्यासंबंधीचे मार्गदर्शन न्यायालयाकडून घेण्याची तयारी चालविली आहे.
हे कसले अल्पवयीन?
फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉटस्ॲप आदी संवादाच्या माध्यमांची सध्या धूम आहे. तरुणाई यावर फेव्हिकॉलचा जोड लागल्यासारखी चिपकून दिसते. काही क्षणांपूर्वी ज्याचे नाव, गाव, पत्ता माहिती नव्हता. ज्याचे तोंडही बघितले नाही, त्याला किंवा तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली किंवा ॲक्सेप्ट केली जाते. नंतर त्यातील काही जण (अल्पवयीन म्हणविणारी) सोशल मीडियावर स्वतःचे न्यूड फोटो आणि व्हिडिओ एकमेकांना शेअर करतात. अशी अनेक उदाहरणे यापूर्वी नागपुरात उघड झाली आहेत. डोक्यावरून पाणी गेल्यानंतर ती पोलिसांकडेही पोहोचली आहे. या संतापजनक प्रकारामुळे यांना ‘अल्पवयीन कसे म्हणावे,’ असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकच नव्हे, तर पोलीस अधिकारीही विचारत आहेत.
---