शेअर ट्रेडिंग रॅकेटमध्ये हवाला ‘लिंक’, दुबईला आरोपींकडे वळविले जातात पैसे
By योगेश पांडे | Published: July 5, 2024 12:58 AM2024-07-05T00:58:00+5:302024-07-05T00:58:47+5:30
केरळमधील आरोपीच्या अटकेनंतर समोर आली बाब
नागपूर : शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतविण्याच्या नावावर फसवणूक करण्याचे प्रमाण देशभरात वाढले असून ‘प्रोफेसर गॅंग’सारख्या अनेक टोळ्या यात कार्यरत आहेत. यातील अनेक आरोपी हे दुबई किंवा युनायटेड किंगडममध्ये बसून हे रॅकेट चालवतात. या रॅकेटमधील एक नवीन खुलासा समोर आला आहे. फसवणुकीनंतर विविध बॅंक खात्यांच्या मार्गे वळविली जाणारी रक्कम अखेर हवालाच्या माध्यमातून दुबईला पाठविण्यात आल्याची बाब केरळमधील एका आरोपीच्या अटकेनंतर तपासातून समोर आली आहे.
‘लोकमत’ने ‘ट्रेडिंगचा भूलभुलैया’ या वृत्तमालिकेच्या माध्यमातून देशविदेशातील सायबर गुन्हेगारांकडून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सुरू असलेल्या ‘फ्रॉड’वर प्रकाश टाकला होता. यात गुन्हेगारांची ‘मोडस ऑपरेंडी’, ‘ब्लॉक ट्रेडिंग’च्या नावाखाली जास्त नफ्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांना भ्रमित करणे, त्यांचे हायटेक जाळे, त्यांनी बनविलेले अनधिकृत ॲप्स इत्यादी बाबींवर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला होता. अशा रॅकेटमध्ये गुंतवणूकदारांनी आरोपींनी सांगितलेल्या बॅंक खात्यात पाठविलेली रक्कम विविध खात्यांमध्ये लगेच वळविली जाते. यासाठी तिऱ्हाईत व्यक्तीच्या नावाने बॅंक खाते उघडण्यात येते. त्याचे संपूर्ण संचालन आरोपी किंवा त्यांचे एजंट करत असतात.
पोलिसांच्या मनी ट्रेलपासून वाचण्यासाठी आरोपींनी नवीन शक्कल शोधून काढली आहे. पोलिसांकडून बॅंक खाते गोठविल्यावर ती रक्कम आरोपींना मिळूच शकत नाही. त्यामुळे वेगाने विविध खात्यांमध्ये रक्कम वळती करून ती रोख स्वरूपात काढली जाते. त्यानंतर हवालाच्या माध्यमातून दुबई किंवा इतर ठिकाणी पाठविली जाते. केरळमधील एका ३.९८ कोटींच्या फसवणुकीच्या घटनेत अबू बकर नावाच्या आरोपीला केरळ पोलिसांनी अटक केली. अबू हा दुबईतून त्याचे रॅकेट संचालित करत होता. ट्रेडिंगसोबतच तो तोतया सीबीआय अधिकारी बनून नागरिकांना ब्लॅकमेलदेखील करत होता. त्याच्या चौकशीतून हवालाची बाब समोर आली. हवालामार्गे दुबईला रोख रक्कम वळविली जात होती. केवळ अबूच नव्हे तर इतर सायबर ठगांच्या टोळ्यादेखील अशाच पद्धतीने भारतीयांच्या मेहनतीच्या पैशांवर हात मारत असल्याचे चित्र आहे.
बॅंक खाते, हवालासाठी एजंट्स
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अबू बकरच्या चौकशीतून एजंट्सच्या साखळीची बाबदेखील उघडकीस आली. ग्रामीण भागातील लोकांना काही पैसे देऊन त्यांच्या नावाने बॅंक खाते हे एजंट्स उघडतात. प्रत्येक एजंट जवळपास ३० ते ४० बॅंक खात्यांची जबाबदारी पाहतो. त्या खात्यांमधील पैसे हवालाच्या माध्यमातून हे एजंट्सच दुसऱ्या राज्यांत किंवा दुबईला पाठवितात. काही एजंट यासाठी मुंबई किंवा इतर मोठ्या शहरात पोहोचतात व तेथून हवालाचे पैसे पुढे पाठवितात.