सकाळी पेपर वाटून घेतली झेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 10:10 AM2018-05-31T10:10:16+5:302018-05-31T10:10:24+5:30
घरात आई नाही. मजुरी करणारे वडीलच दोन वेळचे जेवण तयार करतात. शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी पहाटे ५ वाजता उठून वृत्तपत्रे वाटतो, तर दुपारी बिग बाजाारमधील वडापावच्या दुकानात काम करतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोडकळीस आलेली झोपडी. सोईच्या नावाने केवळ एक ट्युबलाईट, दोन प्लास्टिकच्या खुर्च्या. घरात आई नाही. मजुरी करणारे वडीलच दोन वेळचे जेवण तयार करतात. शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी पहाटे ५ वाजता उठून वृत्तपत्रे वाटतो, तर दुपारी बिग बाजाारमधील वडापावच्या दुकानात काम करतो. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत त्याने बारावीत ८८ टक्के गुण घेतले. अंकित सिद्धार्थ पाटील त्या विद्यार्थ्याचे नाव. राजाबाक्षा येथील पं. बच्छराज कनिष्ठ महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे.
बुधवारी बारावीचा निकाल समोर येताच पास झालेल्या मुलांचा एक वेगळा थाट सर्वत्र दिसून आला. कुणी त्यांना पेढे भरवित होते, कुणी हारतुरे देऊन शुभेच्छा देत होते, कुणी त्यांच्या नवनवीन मागण्या पूर्ण करीत होते तर कुणी त्यांच्यासाठी काय करू, काय नको यासाठी झटत होते. परंतु अंकितला ८८ टक्के गुण मिळवूनही त्याचे कौतुक करणारे कुणीच नव्हते. नेहमीप्रमाणे तो आपल्या बिग बाजार येथील वडापावच्या दुकानात कामावर हजर होता. निकाल पाहण्यासाठी त्याने दुपार नंतर सुटी घेतली होती. मित्रांच्या मोबाईलमधून निकाल पाहताच त्याचेच त्याला आश्चर्य वाटले. कारण अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळाले होते.
अंकितची भेट त्याच्या घरी झाली. त्याला बोलते केल्यावर तो म्हणाला, पाचवीत असताना आई घर सोडून निघून गेली. वडील वेल्डिंगची कामे करतात. परंतु रोज काम मिळतेच असे नाही. दोन वेळचा स्वयंपाक तेच करतात. मोठे वडील अशोक पाटील यांच्यामुळेच पं. बच्छराज शाळेत प्रवेश मिळाला. त्यांनीच शिकवणी वर्गाचा व वह्यापुस्तकांचा खर्च उचलला. अभ्यासात शाळेतील शिक्षकांचीही मोठी मदत झाली. विशेषत: अंजली तिजारे या शिक्षकेने बारावीच्या प्रश्नपत्रिका घेण्यास आर्थिक मदत केली. या सर्वांच्या मदतीमुळेच हे यश गाठता आले. दहावीत ९० टक्के गुण होते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून अंथरुणावर असलेली आजी आणि गणिताचा पेपरच्यावेळी तिचे झालेले निधन यामुळे कमी गुण मिळणार हे अपेक्षित होते, परंतु जास्तच मिळाले, असे म्हणून भावूक झालेला अंकित म्हणाला, खूप मेहनत घ्यायची तयारी आहे सर, याच बळावर अभियंता होण्याचे स्वप्न बाळगून आहे. घरची स्थिती पाहता हे कठीण असले तरी अशक्य नाही, असा विश्वास आहे.