सीताबर्डीत फेरीवाल्यांचा मॉल कर्मचाऱ्यांवर हल्ला; व्यापाऱ्यांकडून पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 01:19 PM2022-10-19T13:19:25+5:302022-10-19T13:27:51+5:30
अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून वाद
नागपूर : मॉलच्या प्रवेशद्वाराजवळचा रस्ता मोकळा सोडण्याच्या मुद्द्यावरून सीताबर्डीत फेरीवाले व मॉलच्या कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून फेरीवाल्यांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला केला व या घटनेमुळे सीताबर्डीत तणाव निर्माण झाला होता.
सीताबर्डी मुख्य मार्गावर ग्लोबल मॉलचे बांधकाम सुरू आहे. येथे हेरिटेज गेटजवळ मॉलचे मुख्य प्रवेशद्वार आहे. या मार्गावर फेरीवाल्यांची वर्दळ असते. त्यामुळे मॉलमध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. मंगळवारी सकाळी ११ वाजता मॉलच्या कर्मचाऱ्यांनी फेरीवाल्यांना येण्याजाण्याच्या मार्गावर दुकान थाटण्यापासून रोखले व रस्ता खुला ठेवण्याचा सल्ला दिला. यावरून कर्मचारी आणि फेरीवाले यांच्यात वाद झाला.
या घटनेची माहिती मिळताच व्यापारीही घटनास्थळी पोहोचले. फेरीवाल्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना बोलावले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. अवैध फेरीवाले हटविण्याची मागणी व्यापाऱ्यांनी सुरू केली तर मॉल व्यवस्थापन व्यवसाय करू देत नसल्याचा आरोप फेरीवाल्यांनी केला.
व्यापाऱ्यांनी सीताबर्डी पोलीस ठाणे गाठून फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी संयम बाळगण्याचा सल्ला दिल्याने व्यापाऱ्यांनी झोन २ चे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप पखाले यांच्याकडे तक्रार केली. सीताबर्डी मुख्य मार्गावर केवळ ११८ फेरीवाले अधिकृत असताना अडीच हजारांहून अधिक फेरीवाल्यांनी रस्ता व्यापल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
शनिवार-रविवारी रस्त्यावरून चालणेही शक्य होत नाही. पोलीस आणि मनपा अधिकारी अवैध फेरीवाल्यांना प्रोत्साहन देतात. राजकीय फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही.