नागपुरातील फूटपाथ दुकानदार उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 11:00 PM2020-02-07T23:00:20+5:302020-02-07T23:01:47+5:30
अतिक्रमण विरोधी कारवाईच्या नावावर फूटपाथ दुकानदारांना उद्ध्वस्त करणे थांबवा, अशी मागणी करीत या कारवाई विरोधात शहरातील फुटपाथ दुकानदारांनी मोर्चा काढून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अतिक्रमण विरोधी कारवाईच्या नावावर फूटपाथ दुकानदारांना उद्ध्वस्त करणे थांबवा, अशी मागणी करीत या कारवाई विरोधात शहरातील फुटपाथ दुकानदारांनी मोर्चा काढून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.
साप्ताहिक बाजार व्यापारी संघटना आणि नागपूर जिल्हा पथविक्रेता (हॉकर्स) संघ व नॅशनल हॉकर्स फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोर्चा काढण्यात आला. कॉटन मार्केट चौक येथून मोर्चा निघाला. लोहापूर, बर्डी मेन रोड, व्हेरायटी चौक, टी पॉइंट, झीरो माईल मार्गे हा मोर्चा संविधान चौकात पोहोचला. फूटपाथवर जितकी जागा एका कारसाठी दिली जाते तितकीच जागा हॉकर्सलाही उपलब्ध असावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अतिक्रमणाच्या नावावर फूटपाथ दुकानदारांविरुद्ध वारंवार कारवाई केली जाते, ही कारवाई थांबवण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागणीचे निवेदन महापौर संदीप जोशी यांना सादर करण्यात आले. जम्मू आनंद यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात सुरेश गौर, हेमंत पाटमासे, कविता धीर, नरेंद्र पुरी, संजय वर्मा, महेश सुमाटे, इमरान शेख, शेखर वर्मा, शारदा वानखेडे, कल्पना दुपारे, नियाज पठाण, मुस्ताक खान, अरविंद डोंगरे, नरेंद्र पुरी आदींसह मोठ्या संख्येने फूटपाथ दुकानदार सहभागी झाले होते.