वन्यप्राण्यांचा हैदोस, शेती करायची कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:11 AM2021-08-27T04:11:55+5:302021-08-27T04:11:55+5:30

विजय नागपुरे कळमेश्वर : जंगलालगतच्या शेतात वन्यप्राणी धुडगूस घालत असल्याने पिके उद्ध्वस्त होत आहेत. सततची नापिकी, निसर्गाचा लहरीपणा त्यातच ...

Haydos of wildlife, how to farm? | वन्यप्राण्यांचा हैदोस, शेती करायची कशी?

वन्यप्राण्यांचा हैदोस, शेती करायची कशी?

Next

विजय नागपुरे

कळमेश्वर : जंगलालगतच्या शेतात वन्यप्राणी धुडगूस घालत असल्याने पिके उद्ध्वस्त होत आहेत. सततची नापिकी, निसर्गाचा लहरीपणा त्यातच या नव्या समस्येने कळमेश्वर तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. गत सहा वर्षात तालुक्यातील ९८९ शेतकऱ्यांना ९५ लाख ६० हजार ५१९ रुपयांची नुकसान भरपाई वनविभागाकडून देण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र करोडो रुपयांच्या शेतमालाचे नुकसान या सहा वर्षात झालेले आहे. यामुळे आम्ही शेती करायची कशी, असा शेतकऱ्यांकडून केला जात आहे. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शासनाने १०० टक्के अनुदानावर सौरऊर्जेवरील तारेचे कुंपण उपलब्ध करावे, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अस्मानी संकटांचा सामना करताना शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. दिवसेंदिवस शेतीपासून काहीही फायदा होत नसताना कर्जाचा डोंगर मात्र वाढतच आहे. सोयाबीन, कपाशी या नगदी पिकांना पुरेसा भाव मिळत नसल्याने हे पिके न परवडणारी ठरत आहेत. शिवाय विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे संत्रा बागा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच परिसरात जंगलालगतच्या शेतात वन्यप्राणी हैदोस घालत असून संत्रा उत्पादनापासून ते खरीप पिकापर्यंत उत्पादन होणे अवघड होत आहे.

तालुक्यातील निमजी व लिंगा बिटला लागून असणाऱ्या शेतात वन्य प्राण्यांचा सतत वावर असतो. त्यात लोणारा, सेलू, साहुली, निंबोली, लिंगा, ऊपरवाही, आष्टीकला, खैरी, सोनेगाव, कोतवालबर्डी, तोंडाखैरी, बिल्लोरी, दहेगाव, सावली, आलेसुर, चीचभवन, केतापार, बोरगाव, गोंडखैरी आदी गावांचा समावेश आहे. जंगलातील रोही, रानडुक्कर, हरिण आदी वन्य प्राणी कळपाने शेतात दाखल होतात. शेतातील संत्रा झाडे, कपाशी, तूर, गहू, हरभरा, पालेभाज्या या पिकांची नासाडी करतात. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी वन विभागाकडून नुकसान भरपाई दिली जाते. परंतु ती भरपाई अत्यल्प असते. शिवाय ही भरपाई मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. एवढी मेहनत करूनही मोबदला अत्यल्प मिळत असल्याने शेतकरी हे काम टाळतात.

पिकांचे वन्यप्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर शेताची राखण करावी लागते. दिवसभर राबल्यानंतर रात्री जागरण असा शेतकऱ्यांचा नित्यक्रम सुरू आहे. परंतु अशातही वन्यप्राण्यांची संख्या अधिक असल्याने पिके फस्त करण्याचा सपाटा प्राण्यांनी लावला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Haydos of wildlife, how to farm?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.