हाहाकार...

By admin | Published: August 14, 2015 03:01 AM2015-08-14T03:01:24+5:302015-08-14T03:01:24+5:30

गुरुवारी मुसळधार कोसळलेल्या पावसाने अवघ्या सहा तासात सर्वत्र हाहाकार माजविला.

Hazer ... | हाहाकार...

हाहाकार...

Next

नागपूर : गुरुवारी मुसळधार कोसळलेल्या पावसाने अवघ्या सहा तासात सर्वत्र हाहाकार माजविला. यात नागपुरातील यश कैलाश अंबारे (वय ३ वर्षे) रा. कस्तुरबानगर, जरीपटका, त्याची आजी रेखा नेवारे (वय ५० वर्षे) रा. जरीपटका, मोकल मसराम (वय ४१ वर्षे) रा. काचीपुरा यांच्यासह नागपूर ग्रामीणमधील रणवीर घनश्याम धुपारे (वय १४ ) रा. कोराड ता. मौदा, कृष्णा जंगलू चापके (वय ४५ वर्षे ) रा. मोहपा व दक्ष विजय सलाम (वय अडीच वर्षे) रा. नवेगाव साधू ता. उमरेड असे सहाजण वाहून गेलेत. तर ४१६ कुटुंबे विस्थापित झाली. दरम्यान सायंकाळी रेखा नेवारे यांचा मृतदेह सापडला.
सकाळी ६ वाजतापासून धो-धो सुरू झालेल्या पावसाने सर्वत्र दाणादाण उडविली होती. शहरातील सर्व रस्त्यांवर पाणी भरल्याने अख्खे नागपूर काही तासासाठी जागेवर थांबले होते. त्याचवेळी गोपालनगर, हिंदुस्तान कॉलनी, काचीपुरा, नंदनवन झोपडपट्टी, बाबा फरिदनगर, समतानगर, हुडकेश्वर व भरतवाडा यासारख्या प्रमुख ११ वस्त्या जलमय झाल्या होत्या.
समतानगरमधील अनेक झोपड्या वाहून गेल्या. अनेकांच्या घरातील भांडी पाण्यावर तरंगत होती.याशिवाय अनेक अपार्टमेंटमध्येही पाणी शिरले होते. हुडकेश्वर येथील सेंट पॉल शाळेत तब्बल साडेतीनशे विद्यार्थी अडकले होते. तसेच शेकडो नागरिकांचा संपर्क तुटला होता. दरम्यान आपत्ती निवारण यंत्रणेने पाण्यात अडकलेल्या ४८६ लोकांना बोटीच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढले. नागनदी व पिवळी नदी दुथडी भरू न वाहत होती. तसेच अंबाझरी, गोरेवाडा व फुटाळा तलाव ओव्हरफ्लो झाला होता. यामुळे गोरेवाडा तलावाचे चारही दरवाजे उघडण्यात आले होते. महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका नागरिकांना बसला. पाऊस ओसरल्यानंतर जिल्हा प्रशासन अािण महापालिकेकडून पूरस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले. सकाळी झालेल्या पावसाचा फटका शाळकरी मुलांसह चाकरमाऱ्यांना सर्वाधिक बसला. तसेच रेल्वे, विमान व शहर वाहतूक व्यवस्था तब्बल पाच तासांसाठी कोलमडली होती. दुपारनंतर परिसरातील स्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
अतिवृष्टीमुळे नागपूर शहरात अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्य सचिव सकाळपासून परिस्थितीचा आढावा घेत होते. तसेच महापौर दिल्ली दौल्यावर असल्याने त्यांनीही वेळोवेळी परिस्थितीची माहिती जाणून घेतल्याची माहिती वर्धने यांनी दिली.
पाणी पुरवठा बाधित
उपराजधानीत पाणीपुरवठा होणारा गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने गुरुवारी येथील चारही दरवाजे उघडण्यात आले होते. शिवाय धो धो पावसामुळे येथील जलशुद्धिकरण केंद्र बाधित झाले आहे. त्यामुळे उद्या, शुक्रवारी लक्ष्मीनगर झोनसह धरमपेठ, गांधीबाग व गिट्टीखदान भागात मर्यादित पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती ओसीडब्ल्यूने दिली. ओसीडब्ल्यूची यंत्रणा जलशुद्धिकरण केंद्रावरील बिघाड दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे.
वीजपुरवठा खंडित
गुरुवारी आलेल्या धो धो पावसामुळे शहरातील विद्युत यंत्रणाही विस्कळीत झाली होती. त्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान वाठोडा, मॉडेल मिल, बगडगंज व एम्प्रेस मिल येथील उपकेंद्रावर ब्रेकडाऊन झाले होते. तसेच सोनबानगर, तांडापेठ, भगवाननगर, देशपांडेनगर व राऊत चौकातील फिडरवरू न होणारा वीजपुरवठा अडीच तासासाठी बंद करण्यात आला होता. शिवाय कोराडी रोडवरील फिडर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत बंद होते. यामुळे नागरिकांना पावसासह विजेचाही फटका सहन करावा लागला.

Web Title: Hazer ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.