‘त्याने’ चक्क न्यायमूर्तींचीच शासकीय गाडी खांबावर चढवली; ही गुपचूप ‘सवारी’ पोलिस कर्मचाऱ्याला चांगलीच भोवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2023 08:43 PM2023-05-22T20:43:54+5:302023-05-22T20:44:23+5:30
Nagpur News कुठलीही परवानगी न घेता लपून उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची शासकीय कार रात्री फिरायला नेण्याचा अतिउत्साहीपणा एका पोलिस कर्मचाऱ्याला चांगलाच नडला.
नागपूर : कुठलीही परवानगी न घेता लपून उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची शासकीय कार रात्री फिरायला नेण्याचा अतिउत्साहीपणा एका पोलिस कर्मचाऱ्याला चांगलाच नडला. संबंधित कार त्याने विजेच्या खांबावर चढवली व त्यामुळे कारचे नुकसान झाले. हा प्रकार कुणाच्याही कानावर न टाकता कार गुपचूप बंगल्यात आणून ठेवली. मात्र, हा प्रकार लक्षात आला व त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. इतकेच नाही तर अक्षम्य बेजबाबदारपणा दाखविल्याचा ठपका दाखवत पोलिस आयुक्तांनी त्याला सेवेतून निलंबित केले.
अमित झिल्पे असे संबंधित कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो उच्च न्यायालयातील एका न्यायमूर्तींच्या शासकीय बंगल्यावर सुरक्षापथकात होता. ५ एप्रिल रोजी रात्रपाळी असताना त्याने मध्यरात्रीच्या सुमारास न्यायमूर्तींची शासकीय कारची किल्ली घेतली व कुणालाही न सांगता कार घेऊन भटकायला निघाला. तासभराहून जास्त वेळ कारने फिरल्यावर तो सिव्हिल लाइन्सकडे परत यायला निघाला. मात्र फुटाळा तलावाजवळ त्याचे नियंत्रण सुटले व कार विजेच्या खांबाला धडकली. यात कारचे बरेच नुकसान झाले होते.
त्याने अंधारात कार गुपचूप बंगल्यात आणून पार्क केली व काही झालेच नाही या आविर्भावात वावरायला लागला. दुसऱ्या दिवशी शासकीय चालकाने कारची अवस्था पाहिली व त्याने इतरांना विचारणा केली. झिल्पे अत्यावश्यक कारण सांगून ड्युटीवरून गायब झाला. त्यामुळे त्याच्यावर शंका गेली. सीसीटीव्हीत शोध घेतला असता अमित झिल्पेच ती कार चालविताना दिसून आला. हा प्रकार पोलिस आयुक्तांनी गंभीरतेने घेतला. त्यांच्या सूचनेवरून सदर पोलिस ठाण्यात झिल्पेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांनी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्याच्याकडून कारचे २.२८ लाखांचे नुकसानदेखील वसूल करण्याचे निर्देश पोलिस आयुक्तांनी दिले आहे. अगोदरच पोलिस आयुक्तांकडून कर्मचाऱ्यांवर बदल्यांची कारवाई होत असताना या प्रकारामुळे तर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.