‘तो’ मृत्यूच्या अगोदरच पोहचला शवागारात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 10:34 PM2018-03-05T22:34:22+5:302018-03-05T22:34:37+5:30

नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलने ब्रेनडेड (मेंदूमृत) घोषित केलेल्या रुग्णाला छिंदवाडा येथील जिल्हा रुग्णालयाने मृत घोषित करून शवविच्छेदनासाठी शवागारात ठेवल्याने सोमवारी एकच खळबळ उडाली.

'He' arrived in the paglal before death! | ‘तो’ मृत्यूच्या अगोदरच पोहचला शवागारात !

‘तो’ मृत्यूच्या अगोदरच पोहचला शवागारात !

Next
ठळक मुद्देब्रेनडेड रुग्णाला केले मृत घोषित : लक्षात आल्यावर पुन्हा केले रुग्णालयात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलने ब्रेनडेड (मेंदूमृत) घोषित केलेल्या रुग्णाला छिंदवाडा येथील जिल्हा रुग्णालयाने मृत घोषित करून शवविच्छेदनासाठी शवागारात ठेवल्याने सोमवारी एकच खळबळ उडाली. मेंदूमृत रुग्ण जिवंत असल्याचे लक्षात आल्यावर पुन्हा नागपूरच्या एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, ब्रेनडेड रुग्ण तब्बल चार तास शवागारात होता.
मिळालेल्या माहितीनुसार, छिंदवाडा येथील रहिवासी हिमांशु भारद्वाज (३०) रविवारी दुपारी रस्ता अपघातात जखमी झाला. छिंदवाडा येथून त्याला नागपुरात पाठविण्यात आले. रात्री साधारण १ वाजता धंतोली येथील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. येथील डॉक्टरांनी तपासून ‘ब्रेनडेड’ घोषित केले. सोबतच नातेवाईकांना अवयवदान करण्यासाठी प्रोत्साहितही केले. यासाठी हिमांशुला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) घेऊन जाण्याचा सल्ला दिला. यावेळेपर्यंत हिमांशुचे हृदय आणि इतर अवयव काम करीत होते. मात्र, नातेवाईक हिमांशुला छिंदवाडाला घेऊन गेले. सकाळी साधारण ५ वाजता छिंदवाडा जिल्हा रुग्णालयात कार्यरत डॉ. ठाकूर यांनी तपासणी करून हिमांशुला मृत घोषित केले. त्यानंतर ब्रेनडेड रुग्णाला शवविच्छेदनासाठी शवागारात ठेवले. सोमवारी सकाळी ९ वाजता शवविच्छेदनासाठी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सफाई कर्मचारी शवागारातून हिमांशुचे शव बाहेर काढण्यासाठी आला. त्यावेळी हिमांशुच्या शरीरात त्याला हालचाली जाणवल्या. त्याने लागलीच याची माहिती शवविच्छेदनासाठी आलेले डॉ. निर्णय पांडे यांना दिली. त्यांनी तातडीने शस्त्रक्रियाच्या वॉर्डात नेऊन आपल्या सहकारी तज्ज्ञाच्या मदतीने तपासणी करून उपचार सुरू केले. याची माहिती नातेवाईकांनाही देण्यात आली. त्यांनी नागपूर गाठले. धंतोली येथील शुअरटेक हॉस्पिटलमध्ये भरती केले. येथे हिमांशुची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते.
अहवालात नाडीचे स्पंदन बंद असल्याची नोंद
कर्तव्यावर असलेले डॉ. ठाकूर यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे की, ज्या अवस्थेत रुग्णाला हॉस्पिटलमध्ये आणले त्यावेळी त्याच्या नाडीचे स्पंदन बंद होते. हृदयाने काम करणे बंद केले होते. या आधारवर त्याला मृत घोषित केले.
-डॉ. सुशील दुबे
वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय, छिंदवाडा

ब्रेनडेड होणे म्हणजे मृत्यू नाही
ब्रेनडेड होणे म्हणजे रुग्णाचा मृत्यू होणे असे नाही. ब्रेनडेड झाल्यावरही रुग्णाचे हृदय आणि इतर अवयव कार्य करीत असतात. या प्रकरणातही असे झाले असावे.
-डॉ. जय देशमुख
वरिष्ठ विशेषज्ञ

Web Title: 'He' arrived in the paglal before death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.