भाजी विक्रेत्याला मारहाण करून हातठेला उलथवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:08 AM2021-07-31T04:08:23+5:302021-07-31T04:08:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अजनीतील एका आरोपीने भाजी विक्रेत्याला मारहाण करून त्याचा हातठेला उलथवला. बुधवारी रात्री ७ च्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनीतील एका आरोपीने भाजी विक्रेत्याला मारहाण करून त्याचा हातठेला उलथवला. बुधवारी रात्री ७ च्या सुमारास अजनीत ही घटना घडली.
विशाल प्रमोद पटले (वय २८) असे आरोपीचे नाव आहे. तो अजनीच्या भगवाननगरात राहतो. चंदननगरातील रहिवासी सुरेश नामदेव बोरकर (वय ५२) हे हातगाडीवर भाजीपाला ठेवून गल्लोगल्ली विकतात. बुधवारी रात्री बोरकर त्यांची हातगाडी घेऊन आरोपी पटलेच्या घरासमोरून जात असताना आरोपीचा श्वान समोरून आला. यावेळी आरोपी पटलेने ‘माझ्या कुत्र्याला हातगाडीचा धक्का लागला तर तुझे या भागातून जाणे येणे बंद करेन. तू मला ओळखत नाही. तुला पाहून घेईन, अशी धमकीही दिली. यावरून आरोपीसोबत बोरकर यांची बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपी पटलेने बोरकर यांची भाजीपाल्याची हातगाडी उलथवली. त्यांना काठीने मारहाणही केली. गंभीर जखमी झालेल्या बोरकर यांना शेजाऱ्यांनी आरोपींच्या तावडीतून वाचवले. बोरकर यांनी नंतर अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी मारहाण व धमकी दिल्याच्या आरोपावरून पटलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.
---