चोरी गेलेला मोबाइल शोधण्यासाठी तो बनला ‘ब्योमकेश बक्षी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 07:30 AM2022-05-20T07:30:00+5:302022-05-20T07:30:01+5:30
Nagpur News चोरलेला मोबाईल शोधण्यासाठी त्याने वापरले डोके आणि काही अवधीतच चोराला नेले पोलिसांसमोर. नागपुरातील घटना.
योगेश पांडे
नागपूर : एरवी मोबाइल चोरी गेल्यानंतर अनेकदा लोक हताश होतात व आता काही तो परत मिळणे नाही असा विचार करून स्वत:च्याच नशिबाला दोष देतात. मात्र नागपुरातील एका व्यक्तीने मोबाइल चोरी गेल्यानंतर पोलिसांकडे न जाता तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वत:च मोबाइलचा शोध घेतला आणि चोरांपर्यंतदेखील पोहोचण्यात यश मिळविले.
ऑनलाइन सतर्कतेमुळे त्याचा मोबाइल परत मिळाला असून त्याने यातून अनेकांना मोबाइल सिक्युरिटीबाबत धडाच दिला आहे. कोराडीतील महादुला येथील मो.जुनेद अब्दुल कादीर कुरेशी (वय २६) यांचे मोबाइलचे दुकान आहे. दोन दिवसांअगोदर दुपारी सव्वाचारच्या सुमारास दोन तरुण त्यांच्याकडे नवीन सीमकार्ड घ्यायला आले. त्यांच्याकडील आधारकार्ड व इतर दस्तावेज घेऊन त्यांनी सीमकार्ड दिले. त्यानंतर काऊंटरवर ठेवलेला त्यांचा मोबाइल फोन दिसत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. बरीच शोधाशोध केल्यावरही फोन न दिसल्याने जुनेदच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. दुकानातील सीसीटीव्ही तपासले असता दोघांपैकी एका तरुणाने मोबाइल चोरी केल्याचे स्पष्ट झाले.
आधारकार्डवर नागपूरचा पत्ता नव्हता. अशा स्थितीत जुनेदने राजू राऊत या मित्राच्या मदतीने ई-मेलच्या आधारे मोबाइलचे लोकेशन तपासले. कोराडी मार्गावरील मॉडर्न शाळेजवळील टॉवरवर मोबाइलचे लोकेशन दर्शविले जात होते. जुनैदने तेथे जाऊन आधारकार्डवरील नाव व फोटोच्या आधारे विचारपूस केली. जवळच एका इमारतीचे काम सुरू असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी तेथे जाऊन चौकशी केली असता दोघांपैकी एक तरुण तेथे आढळून आला. जुनैदने त्याला पकडले. त्याला नागपुरी खाक्या दाखविल्यावर तो अक्षरश: पोपटासारखा बोलायला लागला. त्याचे नाव अर्जुन नागवंशी होते व त्याचा लहान भाऊ भीमने मोबाइल चोरला होता. दोघेही मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील असल्याची बाबदेखील समोर आली. अर्जुनला घेऊन त्यांनी कोराडी पोलीस ठाणे गाठले. एकूण प्रकार ऐकल्यावर पोलिसांनादेखील आश्चर्याचा धक्काच बसला. पोलिसांनी चोरालादेखील ताब्यात घेतले आहे.
थोडी सतर्कता, थोडे तंत्रज्ञान
आजकाल स्मार्टफोन्स हे कुठल्या ना कुठल्या ई-मेलशी जोडले असतात. जर फोन ई-मेलशी ‘सिंक’ असेल तर त्याचे ‘लोकेशन’ संबंधित व्यक्तीला सहजपणे कळू शकते. फोन चोरी गेल्यानंतर जोपर्यंत मोबाइल व इंटरनेट सुरू आहे, तोपर्यंत त्याचे लोकेशन ई-मेलच्या माध्यमातून लक्षात येऊ शकते. शिवाय ‘फाईंड माय डिव्हाईस’मधून चोरी गेलेल्या मोबाइलमधील डाटा डिलीट करून, सर्व खात्यातून लॉग आऊट होणे व मोबाइल लॉक करणे या गोष्टीदेखील करू शकतो. ही सुविधा अनेक वर्षांपासून असूनदेखील अनेक मोबाईलधारकांना याची माहिती नसते.