ट्रक विकत घेतला अन् मालकाला रक्कम न देताच विकूनही टाकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 06:18 PM2021-12-02T18:18:06+5:302021-12-02T18:21:55+5:30
खरबीत राहणारे प्रसाद तुकडोजी मेश्राम यांच्याकडून आरोपीने ट्रक विकत घेतला होता. त्यानंतर दर महिन्याला किस्त देण्याचे ठरले होते. मात्र, आरोपीने ठरल्याप्रमाणे किस्त तर दिली नाहीच पण, ट्रकची परस्पर विल्हेवाटही लावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ट्रक खरेदी-विक्रीच्या साैद्याचे ठरल्याप्रमाणे पैसे न देता खरेदीदार आरोपीने ट्रकची विल्हेवाट लावली. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेची तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी आरोपी खरेदीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. जमरुद्दीन नुरूद्दीन शेख (वय २६) असे आरोपीचे नाव आहे. तो बजरंग लेआऊटमध्ये राहतो.
खरबीत राहणारे प्रसाद तुकडोजी मेश्राम (वय ३९) यांच्याकडून आरोपी जमरुद्दीन शेख याने ३ जुलै २०२० ला एमएच ३१ - सीक्यू ३२५१ क्रमांकाचा ट्रक ७ लाख, ८५ हजारात विकत घेतला होता. प्रारंभी २ लाख, ८० हजार रुपये आणि त्यानंतर दर महिन्याला २९,४०० रुपये (किस्त) देण्याचे ठरले होते. आरोपीने २ लाख, ८० हजारांपैकी १ लाख, ५० हजार रुपये दिले. ठरल्याप्रमाणे नंतर १ लाख, ३० हजार आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याची किस्त दिली नाही. एवढेच नव्हे तर आरोपीने ट्रकची परस्पर विल्हेवाटही लावली.
आरोपीने विश्वासघात केल्याचे लक्षात आल्यानंतर प्रसाद मेश्राम यांनी वाठोडा पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी जमरुद्दीन शेख विरुद्ध फसवणुकीच्या आरोपाखाली बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. आरोपीची चाैकशी केली जात आहे.