‘त्याने’ जंगलात उभारली पक्ष्यांसाठी पाणपोई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:09 AM2021-04-02T04:09:45+5:302021-04-02T04:09:45+5:30
पचखेडी : उन्हाच्या काहिलीने मुक्या प्राण्यांचा जीव काकुळतीला येतो. पाण्याअभावी घशाला कोरड पडल्याने प्रसंगी चिमणीला प्राण मुकावे लागते. या ...
पचखेडी : उन्हाच्या काहिलीने मुक्या प्राण्यांचा जीव काकुळतीला येतो. पाण्याअभावी घशाला कोरड पडल्याने प्रसंगी चिमणीला प्राण मुकावे लागते. या स्थितीवर मात करण्यासाठी एक पक्षिमित्र पुढे सरसावला आहे. जंगलात पक्ष्यांसाठी पाणपोईबरोबरच टाकाऊ वस्तूपासून कृत्रिम घरटी त्याने साकारली आहेत. पक्ष्यांच्या संगोपनाची जाणीव निर्माण करण्याचे काम कुही तालुक्यातील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यालगतच्या चिकना येथील राकेश कळंबे सध्या करतो आहे. जंगलात वा गावालगत शेतशिवारात कुठलाही वन्यप्राणी अडचणीत दिसला की राकेश धाव घेतो. पक्षी निरीक्षण करता करता राकेशला वन्यजीवांची गोडी लागली. पाणी पिण्यासाठी येणारे वन्यजीवही तो न्याहाळू लागला. क्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांना जखमी प्राण्यांची माहिती देऊ लागला. त्यांच्यावर औषधोपचारासाठी अधिकाऱ्यांकडे आग्रह करू लागला. त्याचा हा आग्रह आता येथील अनेक वन्यजीवांसाठी तारक ठरला आहे. तो इथेच थांबला नाही. उन्हाळ्यात त्याने टाकाऊ वस्तूपासून पक्ष्यांसाठी पाणपोई व कृत्रिम घरटी तयार केली आणि ती प्रत्येक गावात जाऊन लोकांना मोफत भेटस्वरूपात दिली. गावांमध्ये नाही तर बाहेरगावी जाऊनसुद्धा तो वन्यजीवांच्या संरक्षणासाठी धाव घेतो.