याचक म्हणून आले अन् सोन्याची चेन लुटून गेले
By योगेश पांडे | Published: June 6, 2023 05:02 PM2023-06-06T17:02:40+5:302023-06-06T17:04:05+5:30
अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
नागपूर : पिण्याच्या पाण्याचे याचक म्हणून आलेल्या दोन तरुणांनी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून पळ काढला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
निर्मला लक्ष्मण भोसले (रानवाडी) असे संबंधित महिलेचे नाव आहे.सोमवारी दुपारच्या सुमारास त्या घरी एकट्याच होत्या. त्यावेळी दोन अनोळखी तरुण कंपाऊंड वॉलच्या आत आले व त्यांनी महिलेला आवाज दिला. निर्मला बाहेर आल्या असता त्यांना त्यांनी तहानलेले असल्याचे सांगत पाणी मागितले. निर्मला यांनी माणुसकीच्या भावनेतून त्यांना पाणी आणून दिले. मात्र रिकामे प्याले परत नेत असताना एका तरुणाने त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चेन ओढली व दोघांनीही तेथून पळ काढला. निर्मला यांनी आरडाओरड करत त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुण फरार झाले. निर्मला यांच्या तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.