पत्नीचे अंत्यदर्शनही घेता आले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 08:57 PM2020-04-23T20:57:36+5:302020-04-23T21:04:48+5:30
पोटाची खळगी भरण्यासाठी गावापासून ८०० किलोमीटर चिचोली (खापरखेडा) येथे रोजगाराच्या शोधात आलेल्या राहुल कुमारच्या पत्नीचा झारखंड येथील गावी २० एप्रिल रोजी मृत्यू झाला. पत्नीचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गावी जाण्याची परवानगी मिळविण्यासाठी राहुल कुमारची धडपड व्यर्थ ठरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (खापरखेडा) : पोटाची खळगी भरण्यासाठी गावापासून ८०० किलोमीटर चिचोली (खापरखेडा) येथे रोजगाराच्या शोधात आलेल्या राहुल कुमारच्या पत्नीचा झारखंड येथील गावी २० एप्रिल रोजी मृत्यू झाला. पत्नीचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गावी जाण्याची परवानगी मिळविण्यासाठी राहुल कुमारची धडपड व्यर्थ ठरली. शेवटी नातेवाईंकांनी अंत्यसंस्कार आटोपले. त्यामुळे किमान पत्नीच्या दशक्रियेसाठी गावी पोहोचायचेच असा संकल्प करीत गुरुवारी राहुल कुमार त्याच्या दोन नातेवाईकासोबत चक्क सायकलने झारखंड येथे रवाना झाला. सावनेर तालुक्यातील चिचोली (खापरखेडा) या गावात लॉकडाऊनमुळे झारखंड राज्यातील तीन मजूर अडकले आहेत. राहुल कुमार (२६), नितेश कुमार (२४) , रमेश कुमार (२४) अशी या तिघांची नावे आहेत. हे तिघेही डिसेंबर महिन्यापासून खापरखेडा येथे हिना इंजिनिअरिंग या कंपनीकडे कामाला आहे. सोमवारी (दि.२०) सकाळी राहुलकुमारची पत्नी शांतीदेवी हिचे अल्प आजाराने माहेरी गाव पालेकला जि. गढवा, झारखंड येथे निधन झाले. लॉकडाऊनमुळे मंगळवारी राहुलकुमारचे गावी पोहोचणे अशक्य असल्याने सोमवारी सायंकाळीच शांतीदेवीचे अंतिम संस्कार नातेवाईकांनी आटोपले. त्यातच राहुलकुमार आणि त्याच्या दोन नातेवाईकाने महाराष्ट्र पोलिसांना झारखंडला जाण्याची परवानगी मागितली होती. तो विनंती अर्जही बुधवारी सायंकाळी नाकारण्यात आला. परवानगी नाकारण्यात आल्यावर राहुलसह त्याचा भाऊ आणि साळा चिंतातूर झाले. याची माहिती राहुलने झारखंड येथे आईवडिलांना दिली. पत्नीचा तिसरा दिवस नाही तर निदान दशक्रियेसाठी तरी येणे गरजेचे असल्याने सर्वच विचारात पडले आणि त्याला येण्याची विनंती केली. सहा महिन्याच्या लहान मुलीची चिंता आणि घरी पोहोचून दशक्रियेचे सर्व धार्मिक विधी पार पाडून पत्नीला मोक्षप्राप्ती व्हावी यासाठी झारखंडला कसेही जायचे, असे राहुलकुमारने ठरविले. झारखंडला जायचे असल्याने तिघांनीही ठेकेदाराकडून पूर्ण कामाचा बाकी असलेला ३५ हजार रुपये पगार घेतला. त्या पैशातून त्यांनी गुरुवारी सकाळी खापरखेडा येथून तीन सायकली विकत घेतल्या आणि २० हजार रुपये पत्नीचा तिसरा दिवस व्हावा यासाठी बँकेत डिपॉझिट केले. काहीही झाले तरी झारखंडला पोहोचायचे हा उद्देश ठेवून ते सायकलने निघाले.