नागपुरात लस घेतल्यानंतर दोन तासातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 10:23 AM2021-07-05T10:23:46+5:302021-07-05T10:24:11+5:30
Nagpur News नागपुरात कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर दोन तासातच एका पुरुषाचा मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर दोन तासातच एका पुरुषाचा मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे, परंतु लसीकरणाच्या ७२ तासांच्या आत मृत्यू झाल्याने मेयोत नियमानुसार शवविच्छेदन करण्यात आले.
दौलत शाहू (५८) असे मृताचे नाव आहे. शाहू यांनी ३ जुलै रोजी मनपाच्या हंसापुरी केंद्रात जाऊन कोरोना लस घेतली. परंतु दोन तासातच शाहू यांना छातीत दुखायला लागले. लागलीच त्यांना मेयोच्या कॅज्युअल्टी विभागात आणले. तेथील डॉक्टरांनी तपासल्यावर त्यांना मृत घोषित केले. मेयोच्या एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले, शाहू यांना मागील चार दिवसांपासून छातीत दुखत होते. याची माहिती त्यांनी घरी दिली होती. परंतु उपचार केले नव्हते. शनिवारी दुपारी लस घेतली. दोन तासानंतर त्यांना अस्वस्थ वाटून छाती दुखू लागली. त्यांच्या नातेवाइकांनी तातडीने मेयोत दाखल केले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. लसीकरणानंतर ७२ तासांच्या आत मृत्यू झाल्याने नियमानुसार व्हिडिओ शूटिंग करून व पॅथालॉजी तज्ज्ञाची मदत घेऊन शवविच्छेदन करण्यात आले.
लसीकरणानंतर आतापर्यंत ८ मृत्यू
प्राप्त माहितीनुसार, लसीकरणानंतर आतापर्यंत सुमारे ८ मृत्यू झाले आहेत. परंतु कोरोना प्रतिबंधक लसीमुळे मृत्यू झाले, असे म्हणणे चुकीचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, मृत्यू झालेल्यांना विविध गंभीर आजार होते. लस घेणे आणि त्यांचा मृत्यू होणे हा योगायोग ठरला असावा; परंतु याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.