घरात खड्डा खोदून ५० लाख लपविले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 06:41 AM2020-11-25T06:41:06+5:302020-11-25T06:41:13+5:30
विजय गुरनुले व त्याच्या टोळीतील साथीदारांचे फसवणुकीचे नवनवे किस्से पुढे येत आहेत. त्यासंबंधीची माहिती उपायुक्त हसन यांनी दिली. गुन्हा दाखल होताच गुरनुले फरार झाला.
नागपूर : गुंतवणूकदारांचे कोट्यवधी हडपणारा महाठक विजय गुरुनुले याने अमरावतीतील नातेवाईकाच्या घरात तीन फूट खड्डा खोदून त्यात ४८.४८ लाखांची रोकड लपविली होती. पोलिसांनी अमरावतीत छापा मारून रोकड जप्त केली, अशी माहिती पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांनी दिली.
विजय गुरनुले व त्याच्या टोळीतील साथीदारांचे फसवणुकीचे नवनवे किस्से पुढे येत आहेत. त्यासंबंधीची माहिती उपायुक्त हसन यांनी दिली. गुन्हा दाखल होताच गुरनुले फरार झाला. त्याने बनवाबनवी करून जमविलेली रोकड लपविण्याचा प्रयत्न केला. त्याच्या चौकशीत त्याने अमरावतीच्या नातेवाईकाकडे रोकड लपवून ठेवली, अशी माहिती दिली. विशेष तपास पथकाने घरात शोधाशोध केली. मात्र रोकड मिळाली नाही. गुरनुलेला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने घरात खड्डा खोदून त्यात रक्कम लपवल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी खड्ड्यातून ४८. ४८ लाख तसेच त्याच्या मित्राकडून ७ लाख अशी ५५ लाखांची रोकड जप्त केली.
आतापर्यंत पोलिसांनी गुरुनुले, त्याची पत्नी व साथीदारांकडून १ कोटी, ३ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याचीही माहिती दिली. गुरनुले याने जुलै २०२० मध्ये वर्धा जिल्ह्यात १० एकर शेती खरेदी केली. त्याची किंमत ४० लाख आहे. गुरनुलेच्या पत्नीच्या बँक खात्यात ३ लाख, कंपनीच्या वेगवेगळ्या खात्यात ५ लाख, देवेंद्र गजभियेच्या खात्यात २६ लाख, ४ लाखांची मुदत ठेव तर इतर आरोपींच्या खात्यात १० लाख रुपये आढळले.