‘त्या’ शेतकऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
By admin | Published: October 29, 2016 02:27 AM2016-10-29T02:27:57+5:302016-10-29T02:27:57+5:30
नाल्यातील पाण्यात वीज प्रवाह प्रवाहित झाल्याने विजेच्या धक्क्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला.
विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू : गोंडी मोहगाव शिवारातील घटना
काटोल : नाल्यातील पाण्यात वीज प्रवाह प्रवाहित झाल्याने विजेच्या धक्क्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोंडी मोहगाव शिवारात बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी काटोल पोलिसांनी विजेची चोरी करणाऱ्या शेतकऱ्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.
नरेंद्र वसंतराव मदनकर (४०, रा. गोंडी मोहगाव, ता. काटोल) असे अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सुशील केशव मारबते (२१) व महेंद्र मनोहर मारबते (२३) दोघेही रा. मोहगाव (भदाडे), ता. नरखेड अशी मृत तरुणांची नावे आहेत. दिवसा थ्री फेज वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने दोघेही बुधवारी रात्री त्यांच्या गोंडी मोहगाव शिवारातील शेतात ओलित करण्यासाठी जात होते. दरम्यान, त्यांच्या शेताच्या मार्गात असलेला नाला ओलांडताना दोघांना विजेचा जोरात धक्का लागला आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या नाल्याच्या काठावर नरेंद्र मदनकर याची शेती आहे. त्याने नाल्यातील पाणी घेण्यासाठी नाल्याच्या काठावर इलेक्ट्रिक मोटरपंप बसविला. त्यासाठी त्याने विजेच्या तारांवर आकडे टाकून वीज घेतली होती. मोटारीला अर्थिंग मिळावे म्हणून त्याने अर्थिंगची वायर नाल्यातील पाण्यात सोडली होती. या अर्थिंगच्या वायरमुळे नाल्यातील पाण्यात वीज प्रवाह प्रवाहित झाला आणि या पाण्यातून जाताना सुशील व महेंद्र या दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यात मदनकर याने विजेची चोरी केल्याचे स्पष्ट झाले. (तालुका प्रतिनिधी)