'त्याने' आधी विष घेतले.. नंतर गळफासही लावला... पण, सुदैवाने वाचला जीव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 08:37 PM2021-12-24T20:37:52+5:302021-12-24T20:46:41+5:30
Nagpur News हताश झालेल्या शेतकऱ्याने विषप्राशन केले. नंतर घरी जाऊन गळफास लावला. मात्र त्याच्या पत्नीने ऐनवेळी येऊन त्याचे प्राण वाचवल्याची घटना नरखेड तालुक्यात घडली.
नागपूर : आर्थिक संकटामुळे हताश झालेल्या ३५ वर्षीय शेतक-याने जहाल विषप्राशन केले, गळफासही लावला. मरणाच्या दारात तो उभा होता. त्याचवेळी पत्नीचे लक्ष घराकडे गेले. बंद दारातून पती फासावर लटकताना पाहताच तिने आरडाओरड केली. शेजारीच असलेल्या वडिलाने धाव घेतली. छतावरून आत उडी मारत त्याला फासावरून काढले. बेशुद्धावस्थेतच मेडिकलमध्ये भरती केले. तब्बल २० दिवस शर्थीचे उपचार चालले आणि अखेर तो शुद्धीवर आला. पत्नी, वडील व डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे त्याला नवे जीवन मिळाले.
नरखेड तालुक्यातील एका छोट्याशा गावात ३५ वर्षीय गणेश (बदललेले नाव) पत्नी व वडिलांसोबत राहतो. त्याला तीन वर्षांचा व दोन महिन्यांच्या मुलगा आहे. गणेश व्यवसायाने शेतकरी. परंतु, एक एकरच्या शेतीवर घरातील जबाबदा-या पूर्ण होत नव्हत्या. त्यामुळे तो नैराश्येत जगत होता. ५ डिसेंबर रोजी त्याने शेतीवर जाऊन कीटकनाशक प्राशन केले. घरी आल्यावर आतून दाराला कुलूप लावले. पाळण्यातील दोन महिन्यांच्या बाळाचे लाड केले. पाळण्याची दोरी काढली. छताला दोरी बांधून गळफास लावला. त्याचवेळी पत्नी घरी आली. बंद दारातून आत डोकावून पाहिल्यावर गळफासावर लटकलेला व आचके देत असलेला पती पाहता तिने हंबरडा फोडला. मदतीसाठी ओरडायला लागली. शेजारीच असलेले गणेशचे वडील धावत येऊन घराच्या छतावर चढले. काैले बाजूला करीत आत उडी घेतली. मुलाला गळफासातून बाहेर काढले. गणेश बेशुद्ध झाला होता. शेजा-यांच्या मदतीने नागपूरच्या मेडिकलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून तातडीने अतिदक्षता विभागात भरती केले. डॉक्टरांचे शर्तीचे उपचार, पत्नी व वडिलांनी न सोडलेली आशा यामुळे तब्बल २० दिवसांनंतर गणेश व्हेंटिलेटरवरून बाहेर आला. गणेशला जीवनदान दिल्याबद्दल त्याच्या वडिलांनी व पत्नीने डॉक्टरांचे आभार मानले.
वाचण्याची शक्यता फारच कमी होती
विष घेतले आणि गळफासही लावून घेतला, त्यानंतर नागपुरात पोहोचण्यास लागलेले दीड ते दोन तास अशा स्थितीत रुग्ण वाचण्याची शक्यता फार कमी असते. मेडिकलमध्ये त्याला दाखल केले तेव्हा त्याची स्थिती अत्यंत गंभीर होती. विष फुफ्फुसापर्यंत पोहोचले होते. गळफासामुळे त्याला श्वासही घेता येत नव्हता. परंतु, आयसीयूच्या डॉक्टरांनी, परिचारिकांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच तो वाचू शकला.
-डॉ. मिलिंद व्यवहारे, प्रमुख आयसीयू, मेडिकल