वडिलांचे दु:ख विसरून तो अभ्यासाला लागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 04:08 PM2018-06-09T16:08:12+5:302018-06-09T16:08:33+5:30
घरातील परिस्थिती हलाखीची असूनही सौरभने मात्र अभ्यासाचे समर्पण कमी होऊ दिले नाही. मात्र एक दु:खाचा डोंगर कोसळला आणि त्याचा विश्वास ढळला. तुटपुंज्या कमाईने का होईना, कुटुंबाला आधार देणाऱ्या वडिलांचा ऐन दिवाळीत मृत्यू झाला आणि तो कोलमडला. खिन्न झालेल्या सौरभचे हातही सुन्न पडल्याने अभ्यासही थांबला होता. अशावेळी इंजिनिअरिंग करणाºया मोठ्या भावाने त्याला धीर दिला व वडिलांसाठी यश मिळविण्याची शपथ दिली. तो पुन्हा उठला आणि अभ्यासाला लागला. दहावीचा निकाल लागला तेव्हा त्याच्याही डोळ्यात अश्रू आले. हे यश पाहण्यासाठी वडील असते तर...
निशांत वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरातील परिस्थिती हलाखीची असूनही सौरभने मात्र अभ्यासाचे समर्पण कमी होऊ दिले नाही. मात्र एक दु:खाचा डोंगर कोसळला आणि त्याचा विश्वास ढळला. तुटपुंज्या कमाईने का होईना, कुटुंबाला आधार देणाऱ्या वडिलांचा ऐन दिवाळीत मृत्यू झाला आणि तो कोलमडला. खिन्न झालेल्या सौरभचे हातही सुन्न पडल्याने अभ्यासही थांबला होता. अशावेळी इंजिनिअरिंग करणाºया मोठ्या भावाने त्याला धीर दिला व वडिलांसाठी यश मिळविण्याची शपथ दिली. तो पुन्हा उठला आणि अभ्यासाला लागला. दहावीचा निकाल लागला तेव्हा त्याच्याही डोळ्यात अश्रू आले. हे यश पाहण्यासाठी वडील असते तर...
विद्या साधना कॉन्व्हेंट, जयताळा येथे शिकणाऱ्या सौरभ अरुण बागडे या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत ८२ टक्के गुण मिळविले आहेत. कठीण अवस्थेमध्ये मिळविलेल्या या गुणांची तुलना होऊ शकत नाही. सौरभ हा गरीब कुटुंबातील. वडील एमआयडीसीमध्ये एका फर्निचर कंपनीत कामाला होते. त्याचा मोठा भाऊ अजय इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाला आहे. सौरभ हुशार असल्याने तो चांगले गुण घेईल, असा सर्वांना विश्वास होता. शाळेनेही त्याला खूप सहकार्य केले. नियमित अभ्यास करणे हे त्याचे ब्रीदच होते. त्यामुळे सुरुवातीपासून त्याने अभ्यासात खंड पडू दिला नाही. मात्र ऐन दिवाळीत वडिलांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. हा कुटुंबावर मोठा आघात होता. त्यामुळे सौरभही खचला होता. यामुळे सौरभचे हात सुन्न पडले होते. हात थरथर कापत असल्याने साधा पेन उचलणेही त्याला जमत नव्हते. डॉक्टरांनी त्याला वात झाल्याचे सांगितले. घरचा कर्ता पुरुष गेल्यामुळे आर्थिक गरजेसाठी आई अन्नपूर्णा यांनी दु:ख बाजूला ठेवून कंपनीत काम सुरू केले. यावेळी सौरभच्या आजारावर उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र मनातून उदास झाल्याने अभ्यासावर परिणाम झाला होता. अशावेळी भाऊ अजयने त्याला मानसिक आधार दिला. तो पुन्हा जिद्दीने अभ्यासाला लागला. हातांचा आजार मात्र पूर्णपणे बरा झाला नव्हता. अशा अवस्थेतही त्याने दहावीची परीक्षा दिली आणि ८२ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाला. आयुष्यात लहानमोठे दु:ख मनावर खोलवर आघात करीत असतात. मात्र त्यातून स्वत:ला सावरून उभे राहणारेच यशस्वी होतात.