प्रेमाची किंमत मोजण्यासाठी त्याने जीव दिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 09:38 PM2020-12-21T21:38:43+5:302020-12-21T21:41:43+5:30
He gave his life,cost the value of love, nagpur newsप्रियकराला टाळण्यासाठी लेकुरवाळ्या प्रेयसीने लग्न करायचे असेल तर दोन लाख रुपये द्यावे लागतील, अशी अट घातली. ती जिव्हारी लागल्याने प्रेमवेड्या तरुणाने स्वत:चा जीव देऊन प्रेमाची किंमत मोजली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रियकराला टाळण्यासाठी लेकुरवाळ्या प्रेयसीने लग्न करायचे असेल तर दोन लाख रुपये द्यावे लागतील, अशी अट घातली. ती जिव्हारी लागल्याने प्रेमवेड्या तरुणाने स्वत:चा जीव देऊन प्रेमाची किंमत मोजली.
टीव्ही मालिकेतील वाटावी अशी ही घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. रोशन भास्कर खिरे (वय २८) असे मृत प्रियकराचे नाव आहे. तो जागृतीनगरात राहत होता. रोशन आणि किरण हे दोघे दुकानात काम करायचे. किरणला पती नाही. दोन मुले आहेत. भाऊ आणि भावजय याच्या आधाराने ती राहते. रोशनसोबत तिचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे त्याने किरणसोबत लग्न करण्याची मानसिक तयारी केली होती. मात्र, किरणला दोन मुले असल्याने लग्न करण्यासाठी ती कचरत होती. तिने त्याची समजूत काढण्याचेही प्रयत्न चालविले होते. मात्र, प्रेमवेडा झालेला रोशन येऊन जाऊन लग्नाचाच विषय काढत होता. त्याला टाळण्यासाठी किरण तसेच तिचे नातेवाईक क्रांती आणि संजयने किरणसोबत लग्न करायचे असेल तर दोन लाख रुपये द्यावे लागेल, अशी अट घातली. दोन लाख रुपये देणे शक्य नाही आणि किरणशिवाय जगणे असह्य झाल्यामुळे रोशनने २० नोव्हेंबरला दुपारी विष प्राशन केले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान २६ नोव्हेंबरला डॉक्टरांनी रोशनला मृत घोषित केले. तत्पूर्वी त्याने एका सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचे कारण लिहून ठेवले. चौकशीत ती सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली. त्यामुळे रोशनचे वडील भास्कर गणपत खिरे (वय ६५) यांची तक्रार नोंदवून घेत वाठोडा पोलिसांनी रोशनच्या आत्महत्येला कारणीभूत ठरवून किरण, क्रांती आणि संजय या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
खरेच असे घडले का ?
या प्रकरणाची वाठोड्यात उलटसुलट चर्चा आहे. रोशनला खरेच दोन लाख रुपये मागण्यात आले होते का, आरोपींनी त्याला खरेच त्रास आणि धमकी दिली होती का, असे प्रश्न चर्चेला आले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने आधीच पितृछत्र नसलेल्या किरणच्या दोन मुलांचे काय होणार, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरे म्हणजे स्वत:चा जीव कुणी उगाच देईल का, असेेही विचारले जात आहे.