डेंग्यूच्या विरोधात त्याने दिला यशस्वी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:07 AM2021-05-31T04:07:23+5:302021-05-31T04:07:23+5:30
नागपूर : अचानक ताप आला, नक्कीच कोरोना असेल घरच्या सर्वांनाच वाटले. यामुळे सुरुवातीला कोरोनाची ‘रॅपिड अँटिजन’ आणि नंतर ...
नागपूर : अचानक ताप आला, नक्कीच कोरोना असेल घरच्या सर्वांनाच वाटले. यामुळे सुरुवातीला कोरोनाची ‘रॅपिड अँटिजन’ आणि नंतर ‘आरटीपीसीआर’ चाचणी केली. परंतु, दोन्ही चाचण्या ‘निगेटिव्ह’ आल्या. डॉक्टरांनी ‘सिटी स्कॅन’ही केले. तेही सामान्य होते. अखेर डेंग्यूची चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली. या दरम्यान रक्तातील प्लेटलेट कमी होऊन १५ हजारांपर्यंत आल्या; परंतु डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. मी सुद्धा पॉझिटिव्ह विचार करीत औषधोपचाराला समोर गेल्याने सात दिवसांत बरा होऊन रुग्णालयातून घरी परतलो.
नागपुरातील ३८ वर्षीय सुनील ‘लोकमत’शी बोलत होता. सध्या कुठलेही आजाराची लक्षणे कोरोनाची जोडून पाहिले जात असल्याने उपचारात उशीर होत असल्याचे चित्र आहे. परंतु, डॉक्टरांचा अनुभव व तातडीने आजाराचे निदान व उपचारांमुळे रुग्ण बरे होत आहेत. ‘सुनील’वर उपचार करणारे किंग्जवे हॉस्पिटलचे ‘क्रिटिकल केअर फिजिशियन’ डॉ. अब्जल शेख यांनी सांगितले, सुनील जेव्हा रुग्णालयात आला तेव्हा त्याला १०२ ते १०४ दरम्यान ताप होता. सलग तीन तिवस तो तापाने फणफणत होता. त्याच्या कोरोनाची आणि सिटी स्कॅनचा रिपोर्ट निगेटिव्ह होता. यामुळे डेंग्यूसह इतर आजारांची तपासणी केली. यात डेंग्यू पॉझिटिव्ह आला. उपचाराला सुरुवात झाली; परंतु त्याचा रक्तातील प्लेटलेट अडीच लाखांहून १५ हजारांवर आले होते. स्थिती गंभीर झाली होती; परंतु अनुभवाच्या बळावर केलेला औषधोपचार व सुनीलने दिलेला प्रतिसाद यामुळे पाच दिवसांतच त्याचा प्लेटलेट वाढून ५० हजारांवर गेल्या. यामुळे सात दिवसांत त्याला सुटी देण्यात आली.
-डेंग्यूचा प्रादुर्भाव व तिसऱ्या लाटेच्या अंदाजामुळे अधिक काळजी घेण्याचे आवाहन
पुढील महिने पावसाचे आहेत. पाऊस म्हटले की, जागोजागी पाणी साचून डेंग्यूला कारणीभूत असलेले ‘एडीस’ डासाचा प्रादुर्भाव. विशेष म्हणजे, सुरुवातीच्या दिवसातही उकाडा राहत असल्याने लोकांचे कुलर सुरू असतात. परिणामी या डासांच्या उत्पत्तीला मदत होते. सध्या डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अँटीबायोटिक किंवा अँटीव्हायरल औषध नाही. यातच कोरोनाचा तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला जात असल्याने अधिक काळजी घेण्याचे आवाहनही डॉ. अब्जल शेख यांनी केले आहे.