महिलांना पाहून टाळ्या वाजविणे ‘त्याला’ महागात पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 10:24 PM2020-04-21T22:24:02+5:302020-04-21T22:24:22+5:30
तोंडावर मास्क न घालता आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन न करता मॉर्निंग वॉकला निघालेल्या महिलांना पाहून टाळ्या वाजविणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तोंडावर मास्क न घालता आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन न करता मॉर्निंग वॉकला निघालेल्या महिलांना पाहून टाळ्या वाजविणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. त्या व्यक्तीविरुद्ध मानकापूर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. यासंबंधाने आरोप-प्रत्यारोप तसेच उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
प्रकरण मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवनगर परिसरातील आहे. परिसरातील रहिवासी महिला सोमवारी सकाळी फिरायला निघाल्या. आपल्या घराच्या गॅलरीत उभा असलेल्या एका व्यक्तीने त्यांना पाहून टाळ्या वाजविल्या. शहरात कोरोनाचा प्रकोप सारखा वाढत आहे. तुम्ही तोंडावर मास्क बांधलेला नाही आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’चेही पालन करीत नाही, हा प्रकार योग्य नाही, असे म्हणत या व्यक्तीने टाळ्या वाजविल्या. मात्र त्याची ही गांधीगिरी त्याच्यावर उलटली. महिलांनी त्याला खडेबोल सुनावले. त्यावरून बाचाबाची झाली. महिलेने आपल्या पतीला माहिती देऊन बोलावून घेतले. महिलेचा पती पोलीस विभागात कार्यरत आहे. तो तडक पोहोचला आणि टाळ्या वाजविणाऱ्या व्यक्तीशी त्याने जोरदार वाद घातला. त्यानंतर महिलेने संबंधित व्यक्तीविरुद्ध मानकापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दिली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. ज्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला ते वकील असून, आपण गांधीगिरीच्या रूपाने टाळ्या वाजविल्या, असे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाच्या संबंधाने परिसरात उलटसुलट चर्चा असून दोन परिवारातील हा जुना वाद आहे तो आता या वळणावर आल्याचीही चर्चा आहे.