पत्नीला मेसेज करून ‘तो’ निघाला होता आत्महत्या करायला; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 08:00 AM2021-09-16T08:00:00+5:302021-09-16T08:00:12+5:30
Nagpur News व्यवसायात नुकसान झाल्यामुळे आत्महत्या करण्यासाठी पुण्याला जात असलेल्या तरुण व्यापाऱ्याला नंदनवन पोलिसांनी सतर्कता दाखवून शोधून काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्यवसायात नुकसान झाल्यामुळे आत्महत्या करण्यासाठी पुण्याला जात असलेल्या तरुण व्यापाऱ्याला नंदनवन पोलिसांनी सतर्कता दाखवून शोधून काढले. पोलिसांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्याची समजूत घालून त्याला या धक्क्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. (‘He’ had gone to commit suicide by texting his wife)
पूर्व नागपुरातील २८ वर्षांच्या तरुण व्यापाऱ्याला व्यवसायात नुकसान झाल्यामुळे तो हताश झाला होता. त्याने मंगळवारी दुपारी पत्नीला मेसेज पाठवून ‘मी सर्वांची माफी मागतो. मी मनाने कमजोर आहे. माझ्या मुलाला कमजोर बनू देऊ नको. पुढील जन्मात मी तुम्हाला सोडून जाणार नाही. तुमची साथ देईल. या जन्मात मला माफ कर’ असे सांगितले. पतीचा मॅसेज पाहून पत्नीच्या पायाखालची वाळू घसरली. तिने कुटुंबीयांना याबाबत सूचना दिली. कुटुंबीयांनी त्वरित नंदनवन पोलीस ठाणे गाठले.
प्रभारी निरीक्षक रवींद्र दुबे यांनी त्वरित शोधमोहीम सुरू केली. त्यांनी मोबाइलच्या आधारे तरुण व्यापाऱ्याला शोध घेतला. पोलिसांना त्याची ट्रॅव्हल्स बस पुण्यासाठी रवाना झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ट्रॅव्हल्स बसच्या चालकाशी संपर्क साधला. त्यावेळी ट्रॅव्हल्स अमरावतीत होती. पोलिसांनी बसच्या चालकाला बस घेऊन त्वरित गाडगेनगर पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. बस ठाण्यात पोहोचताच दुबे यांच्या सूचनेवरून गाडगेनगर पोलिसांनी या तरुण व्यापाऱ्याला खाली उतरविले तर व्यापाऱ्याच्या कुटुंबीयांनाही अमरावतीला पाठविण्यात आले.
संबंधित व्यापाऱ्याला नागपुरात आणून पोलिसांनी त्याची समजूत घातली. नंदनवन पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे आपल्या पतीचा जीव वाचल्याची भावना व्यापाऱ्याच्या पत्नीने व्यक्त करून निरीक्षक रवींद्र दुबे, उपनिरीक्षक डी.एस. थोरवे यांचे आभार मानले.
................