SSC Result 2020; तो वृत्तपत्र वाटतो.. ती करते शेतमजुरी.. तर त्याचे वडिल करतात हातमजुरी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 10:05 AM2020-07-30T10:05:00+5:302020-07-30T10:05:02+5:30
संपन्न घरातील मुले जे काही करू शकतात तसे निम्न आर्थिक स्तरावर असलेल्या घरातील मुले करू शकत नाहीत. त्यांना कुटुंबाच्या चरितार्थासाठी आर्थिक हातभारही लावावा लागत असतो. मोलमजुरी करून ते शिक्षण घेतात.. त्यांचा लढा अन्य मुलांपेक्षा अधिक खडतर असतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहावीचा निकाल एका अर्थाने आयुष्यातला पहिला निर्णायक ठरू शकेल असा टप्पा. त्यामुळे त्या निकालावर सर्वांचीच मदार असणे तितकेच अपरिहार्य. अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी संपन्न घरातील मुले जे काही करू शकतात तसे निम्न आर्थिक स्तरावर असलेल्या घरातील मुले करू शकत नाहीत. त्यांना कुटुंबाच्या चरितार्थासाठी आर्थिक हातभारही लावावा लागत असतो. मोलमजुरी करून ते शिक्षण घेतात.. त्यांचा लढा अन्य मुलांपेक्षा अधिक खडतर असतो. त्यामुळेच त्यांच्या यशाला घामाची झळाळी असते..
अश्मितने वृत्तपत्र वाटून केला अभ्यास
दररोज पहाटे उठून लोकांच्या घरी जगभरातील माहितीचा खजिना म्हणजे वर्तमानपत्र पोहचविणाऱ्या वडिलांचे परिश्रम त्याला दिसायचे. मेहनत घेणाºया आपल्या वडिलांना शिक्षणातून आनंद देण्याचे ध्येय त्याने मनाशी बांधले. या ध्येयाचा पहिला टप्पा अश्मितने आज पूर्ण केला. दहावीच्या परीक्षेत ९३.६० टक्के गुण प्राप्त करून अश्मितने वडिलांच्या परिश्रमाचे चीज केले. भांगे ले-आऊट, जयताळा रोड या भागात राहणारे वृत्तपत्र विक्रेता शैलेश भगत यांचा मुलगा अश्मित हा सोमलवार निकालस, खामलाचा विद्यार्थी. अश्मितची आईसुद्धा एका रुग्णालयात नोकरी करते. शाळेव्यतिरिक्त दररोज ४-५ तास अभ्यास करण्याचे वेळापत्रक त्याने ठरविले. परीक्षेच्या काळात त्याचा वेग वाढला. या मेहनतीचे फळ त्याला निकालातून मिळाले. ९३.६० टक्क्यांसह गुणवत्ता यादीत त्याने स्थान प्राप्त केले. अश्मितने ‘एव्हीएशन इंजिनियर’ होण्याचे स्वप्न बाळगले आहे.
गौरवने पहाटे चारला उठून वाटली वृत्तपत्रे
जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे काटोलच्या गौरव मोरेश्वर हगोने याने सिद्ध करून दाखवले आहे. परिस्थितीचा बाऊ न करता वृत्तपत्र वाटून त्याने १० वीच्या परीक्षेत ९६.८० टक्के गुण मिळवित तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
कुटुंबात चार व्यक्ती आई, वडील, धाकटा भाऊ व गौरव. पेठ बुधवार येथील वडील मोरेश्वर हगोने गवंडी काम करून कुटुंबाचा गाडा चालवितात. आई आजारी असल्याने वडिलांना हा गाडा चालविणे अशक्य होते. त्यामुळे घर चालवायचे की मुलांना शिकवायचे हा त्यांच्या पुढे नेहमी उद्भवणारा प्रश्न. घरची परिस्थिती हलाखीची असल्याची जाणीव गौरवला होती. मात्र त्याने परिस्थितीचा बाऊ न करता आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी शहरात वृत्तपत्र वाटण्याचे काम हाती घेतले. पहाटे ४ वाजता उठून अभ्यास त्यानंतर ६ ते ७.३० वा.पर्यंत वृत्तपत्र वाटून तो दुपारी नगर परिषद हायस्कूल शाळेत जायचा. तिकडून आल्यानंतर तो रात्री ८ पर्यंत पुन्हा अभ्यास करायचा. गौरवच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. त्याला संशोधक व्हायचे आहे.
दर्शना जात होती शेतमजुरीला
घरी अठराविश्वे दारिद्र्य. वडिलांचे छत्र नाही. सर्व भार एकट्या आईवर. मुलीला गरिबीतही लढण्याचे धडे दिले आणि तिने दहावीत ९२ टक्के गुण मिळवत झोपडीत यशाचा दीप लावला. ही कहाणी आहे रामटेक तालुक्यातील भोजापूर येथील दर्शना कैलास मेंघरे या मुलीची. ती राष्ट्रीय आदर्श स्कूलची विद्यार्थिनी आहे. आई आशा वर्करचे काम करायची. काम मिळाले नाही तर शेतमजुरी करायची. मुलेही सुटीच्या दिवशी शेतमजुरीच्या कामावर जायचे. दर्शनाला ५०० पैकी ४५९ गुण मिळाले आहेत. यासोबतच ती शाळेत टॉप आली आहे. दर्शनाला विज्ञान शाखेत प्रवेश घेत अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे आहे.
शुभमला चौकीदार बनायचेय, पण आरोग्याचा..
चौकीदारी करणारे वडील व तेथेच झाडूपोछा करणाºया माउलीच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत उत्तम कामगिरी केली आहे. दिनेश व सुनिता फुंडे यांचा मुलगा शुभम याने खडतर परिस्थितीतही ८४ टक्के गुण मिळवले आहे.
शुभमचे वडील खामला येथील पराते सभागृहात चौकीदार असून आई सुनिता तेथेच साफसफाईचे काम करते. शुभम व लहान मुलगा पवन यांना सोमलवार, खामला शाळेत प्रवेश मिळाला. शुभमला घरच्या परिस्थितीची जाण असल्याने जमेल तशा स्थितीत अभ्यासावर भर दिला. शुभमला बी. फार्म मध्ये प्रवेश घेऊन औषधालय उभे करायचे आहे. कमाई आणि समाजसेवा या दोन्ही गोष्टी साध्य करत 'आरोग्याचा चौकीदार' होण्याची भावना त्याने 'लोकमत'कडे व्यक्त केली.
प्रांजलीच्या यशाने गोड झाली आईची खिचडी
लेकीने चांगले गुण घेतले म्हणून प्रांजलीची आई आज आनंदी आहे. ती ज्या शाळेत शिकते त्याच शाळेत तिची आई खिचडी बनविण्याचे काम करते. वडील गजेंद्र यांना स्टारबसमध्ये वाहक म्हणून नोकरी आहे. त्याच वेळी प्रांजलीच्या आईला सदरस्थित जाईबाई चौधरी शाळेत खिचडी बनविण्याचे कामही मिळाले. संचालकांनी त्यांची शाळेमध्ये राहण्याची व्यवस्थाही केली. प्रांजलीने आज दहावीत ८१ टक्के गुण मिळविले आहेत.
कधी हातमजुरी तर कधी गल्लोगल्ली फिरून भाजीपाला विकणारे गिट्टीखदान निवासी बबलू नागदेवते यांचा मुलगा सिद्धांतने ८५ टक्के गुण मिळविले. यानंतर पॉलिटेक्निक करून इंजिनियर होण्याचे ध्येय त्याने बाळगले आहे. खंडाळा, कळमेश्वर येथे जेमतेम दोन एकराचे अल्पभूधारक शेतकरी संजय भांगे यांची मुलगी सृष्टीने ९०.८० टक्के गुण मिळवून गुणवत्तेची चुणूक दाखविली. कॉमर्स घेऊन बँकिंग क्षेत्रात यश मिळविण्याचे ध्येय तिने उराशी बाळगले आहे. यांच्यासोबतच ८८.४० टक्के गुण घेणारी दीप्ती देवीदास धनविजय हिचे वडील दुकानात टेलर आहेत तर आई एका रुग्णालयात सुरक्षा रक्षक. त्यांची बारावीत असलेली मोठी मुलगी दिव्यानेही गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. बस चालक विकास सोनटक्के यांची मुलगी भूमिका हिनेही कुठलाही शिकवणी वर्ग न लावता ९०.२५ टक्के गुण मिळविले आहेत. एमबीबीएस करून सर्जन होण्याचे स्वप्न तिच्या मनात आहे. दुसरीकडे ट्रक चालकाची मुलगी शफाक शेख हिनेही ९० टक्के गुण प्राप्त केले आहेत.