भावी पत्नीला जेवायला बोलाविले अन् सावत्र जावयाने त्याचा जीव घेतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2022 02:14 PM2022-04-01T14:14:51+5:302022-04-01T15:16:42+5:30
जयकिशनच्या परिवारात आई, सावत्र वडील आणि सावत्र बहीण होती. काही दिवसांपूर्वी त्याच्या आईचे निधन झाल्यानंतर त्याची प्रिया नामक सावत्र बहीण घर हडपण्यासाठी आक्रमक झाली. त्यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला.
नागपूर : भावी पत्नीसोबत एकत्र जेवण्याची तयारी करणाऱ्या तरुणावर फावड्याने हल्ला चढवून त्याच्या सावत्र जावयाने त्याचा जीव घेतला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली.
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरस्वतीनगरात बुधवारी मध्यरात्री हत्या झालेल्या तरुणाचे नाव जयकिशन श्यामराव जावनकर (वय २७) आहे. तो प्रॉपर्टी ब्रोकर म्हणून काम करायचा. त्याचे लग्न जुळले होते. त्यासाठी त्याच्या घरात तयारी सुरू होती. घराची डागडुजीही करण्यात येत होती.
जयकिशनच्या परिवारात आई, सावत्र वडील आणि सावत्र बहीण होती. काही दिवसांपूर्वी त्याच्या आईचे निधन झाल्यानंतर त्याची प्रिया नामक सावत्र बहीण घर हडपण्यासाठी आक्रमक झाली. त्यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. प्रियाचा पती भुऱ्या उर्फ नितेश शंकरराव सोनवणे हा घर खाली करून देण्यासाठी जयकिशनसोबत भांडू लागला. याच कारणावरून बुधवारी मध्यरात्री जयकिशनचा सावत्र जावई भुऱ्या उर्फ नितेश शंकरराव सोनवणे याने वाद घातला. एवढेच नव्हे तर फावड्याने हल्ला चढवून जयकिशनचे डोके फोडले.
मित्रावर गंभीर हल्ला झाल्याचे पाहून भावेश भोंगे नामक जयकिशनच्या मदतीला धावला. त्याने आरोपीच्या हातातील फावडे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपी भुऱ्याने भावेशच्या हाताला कडाडून चावा घेतला. दरम्यान, जयकिशन गंभीर जखमी झाल्याने तसेच शेजारी गोळा झाल्याने आरोपी भुऱ्या घाबरला आणि हुडकेश्वर ठाण्यात पोहोचला. तेथे त्याने जयकिशनसोबत वाद झाल्याची माहिती पोलिसांना दिली.
महिनाभरापासून होते आक्रमक
महिनाभरापूर्वी प्रिया तिचा आरोपी नवरा अन् जयकिशन यांच्यात याच कारणावरून जोरदार वाद झाला. प्रकरण हुडकेश्वर ठाण्यात पोहोचले. यावेळी पोलिसांसमोर प्रियाने अश्रू गाळत सावत्र भाऊ जयकिशनवर वेगवेगळे आरोप लावले. पोलिसांनीही तिच्या ‘रडण्यावर’ विश्वास ठेवून जयकिशनवरच कारवाईचा पवित्रा घेतला. त्यामुळे प्रिया आणि तिचा नवरा भुऱ्या निर्ढावला. त्याचमुळे भुऱ्याने जयकिशनचा जीव घेतला.
'तो' ठरला अखेरचा कॉल
जयकिशन आणि त्याची दिशा नामक भावी पत्नी वैवाहिक जीवनाचे स्वप्न रंगवीत होते. बुधवारी रात्री त्याने दिशासोबत व्हिडीओ कॉलवर संभाषण केले. तिला सोबत जेवण करण्यासाठीही बोलाविले. मात्र, ती पोहोचण्यापूर्वीच जयकिशनचा सावत्र जावई त्याची काळ बनून वाट बघत होता. त्याने जयकिशनची हत्या करून त्याच्यासोबत दिशाच्याही स्वप्नांची राख केली.
२४ तासांत दोन, महिनाभरात ११
उपराजधानीतील गुन्हेगारी पुन्हा उफाळू लागली आहे. थंडावलेल्या गुन्हेगारीमुळे फेेब्रुवारी महिन्यात शहरात एकही हत्येची घटना घडली नाही. मात्र, मार्च महिन्यात पुन्हा गुन्हेगारी उफाळली असून २४ तासांत दोन तर मार्च महिन्यात हत्येच्या ११ घटना घडल्याने पोलीसही हादरले आहेत.