...शेवटी तो ‘बळी’राजाच : विदर्भात रोज चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By योगेश पांडे | Published: December 10, 2023 11:54 PM2023-12-10T23:54:52+5:302023-12-10T23:57:12+5:30
सरकार कुणाचेही असो, बळीराजाच्या नशिबी मरणयातनाच : दशकातील आत्महत्यांचा परमोच्च बिंदू पावणेतीन वर्षांत
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : राज्यात वर्षातून तीनदा विधिमंडळाचे अधिवेशन होते व बहुतांश वेळा शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरच गोंधळ होतो. मात्र सरकार कुठलेही असले तरी प्रत्यक्षात बांधावरील शेतकऱ्याला मात्र दिलासा मिळत नसल्याचेच चित्र आहे. या वर्षभरात विदर्भात दर दिवसाला सरासरी चारहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. दुर्दैवाची बाब म्हणजे मागील दशकभरातील आकडेवारीचा परमोच्च बिंदू मागील पावणेतीन वर्षांतच दिसून आला आहे. विदर्भाच्या भूमीत अधिवेशन होत असताना ही आकडेवारी सत्ताधारी व विरोधकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन टाकणारी आहे.
शेतकऱ्यांच्या मरणयातनेवर राजकारण बाजूला ठेवून शाश्वत उपाययोजनांवर मंथन करतील का, असा सवाल उपस्थित होत आहे. ‘लोकमत’ला विदर्भातील सर्व जिल्ह्यांतून प्राप्त झालेल्या आकडेवारीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. २०२३ साली विदर्भातील अमरावती विभागात १० महिन्यांतच ९५१ शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतील २५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. १० महिन्यांत विदर्भात १ हजार २०८ शेतकऱ्यांना विविध कारणांमुळे स्वत:चा जीव द्यावा लागला. सरासरी दररोज चार शेतकऱ्यांनी इहलोकाचा निरोप घेतला.
-पावणेतीन वर्षांत सव्वाचार हजारांहून अधिक आत्महत्या
कोरोनाचे कुचक्र सुरू झाल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना घोषित केल्या. मात्र कधी अवकाळी तर कधी दुष्काळ, कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटात शेतकरी अडकतच गेला. जानेवारी २०२१ ते ऑक्टोबर २०२३ या ३४ महिन्यांच्या कालावधीतच विदर्भात ४ हजार ३३१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यात अमरावती विभागातील सर्वाधिक ३ हजार ३३१ शेतकऱ्यांचा समावेश होता. तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतील हजार शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले.
-२५ हजारांचा आकडा पार, २०२२ मध्ये सर्वाधिक आत्महत्या
२००१ सालापासून विदर्भात २५ हजार ४२५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यात नागपूर विभागातील ५ हजार ५०८ तर अमरावती विभागातील १९ हजार ८१७ आत्महत्यांचा समावेश आहे. जर दशकभराच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर २०२० नंतर आत्महत्यांचे प्रमाण आणखी वाढत गेले. २०२२ मध्ये सर्वाधिक १ हजार ५६३ तर २०२१ मध्ये १ हजार ५६० शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले.
-खरिपाच्या काळात सर्वाधिक दाहकता
यंदा शेतकऱ्यांना पावसाने चांगलीच हुलकावणी दिली. खरीप हंगामात पिकांची पेरणी केल्यावर पावसाने पाठ फिरवली व अनेक जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणीची वेळ आली. यात शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले. सप्टेंबर महिन्यात १३६ तर ऑगस्ट महिन्यात १३० शेतकऱ्यांनी जीव दिला.
-२०२३ मधील महिनानिहाय दाहकता
महिना : आत्महत्या
जानेवारी : १२९
फेब्रुवारी : ९६
मार्च : १२६
एप्रिल : १०८
मे : १२०
जून : ११४
जुलै : १२२
ऑगस्ट : १३०
सप्टेंबर : १३६
ऑक्टोबर : १२७
-२०२१ पासूनच्या आत्महत्या
वर्ष : आत्महत्या
२०२१ : १,५६०
२०२२ : १,५६३
२०२३ (ऑक्टोबरपर्यंत) : १,२०८