अमरावती जिल्ह्यातील बहिरमबुवाच्या पायथ्याशी राहणारा पाथरवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:43 PM2018-01-29T12:43:15+5:302018-01-29T12:44:54+5:30

किती वर्स झाले आठवत नाही आता पण बहिरमबाबाच्या संगतीनं ऱ्हातो.. पांढरे मळकट धोतर, तसाच शर्ट आणि डोक्यावर टोपी.. हातात छिन्नी आणि हातोडा. हे आहेत मारोतराव भीमराव शिंदे.

He lives with stones and god at Bahiram in Amravati district | अमरावती जिल्ह्यातील बहिरमबुवाच्या पायथ्याशी राहणारा पाथरवट

अमरावती जिल्ह्यातील बहिरमबुवाच्या पायथ्याशी राहणारा पाथरवट

googlenewsNext
ठळक मुद्देखरपा, भुरका व काळ्या हेच सवंगडी

वर्षा बाशू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: किती वर्स झाले आठवत नाही आता पण बहिरमबाबाच्या संगतीनं ऱ्हातो.. पांढरे मळकट धोतर, तसाच शर्ट आणि डोक्यावर टोपी.. हातात छिन्नी आणि हातोडा. हे आहेत मारोतराव भीमराव शिंदे. वय साधारण ४५ ते ५० च्या घरातले. व्यवसाय पाथरवटाचा. अमरावती जिल्ह्यातल्या बहिरम या यात्रेच्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी एका साध्या कनातीत गेल्या कित्येक वर्षांपासून राहतात. सोबत त्यांची पत्नीही असते.
एकदा बहिरम यात्रेला आलो आणि येथेच राहून गेलो. हातात असलेल्या पाट्यावर टाके घालता घालता ते सांगू लागतात. आमचं घराणंच पाथरवटाचं. याभागात आमचे पूर्वज यायचे. त्यांच्यासोबतीने आलो आणि इथलाच झालो.
त्यांचे खोपटे म्हणजे चारही बाजूंनी खालून उघडा असलेला एक तंबू. त्यातच चार गाडगी मडकी आणि जरुरीपुरते थोडेसेच सामान. दिवसभर अंगणात बसून जाती आणि पाटे वरवंटे घडवत रहायचे हा एकमेव उद्योग.
येथे पाट्या वरवंट्याचा दगड येतो तो बुलढाणा जिल्ह्यातून. त्यात खरपा हा लाल रंगाचा दगड सर्वात मजबूत असतो. त्यानंतर येतो पांढरट भुरका व त्याखालोखाल असतो काळा दगड. एक मोठ्या आकाराचं जात घडवायला किमान तीन दिवस लागतात तर पाटा वरवंटा हा साधारण दोन दिवसात होतो.
दिवसरात्र हातोडा आणि छिन्नीने ठोकून ठोकून त्यांचे खांदे दुखतात असं सांगून रात्रीची झोप झाली की सकाळी बरं वाटतं असंही ते म्हणतात. दगडाला टाके घालताना डोळ्याना खूप जपावे लागते. डोळ्यात कण उडाला तर डोळा जाण्याची भीती असते. मात्र मारोतरावांना अद्याप चष्मा लागलेला नाही. मधुमेह, ब्लडप्रेशरसारखा कुठलाही शहरी आजार नाही. तब्येत ठणठणीत आहे. सकाळी उठून काशी तलावात जाऊन स्नान करणे, बहिरमबुवासमोर डोके ठेवून परत येणे आपल्या नित्याच्या कामाला लागणे हा त्यांचा रोजचा शिरस्ता. जगात काय नवे घडते आहे, तंत्रज्ञान किती प्रगत झाले आहे याच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही. त्यांचे जग फक्त बहिरमचा पायथा एवढेच.

Web Title: He lives with stones and god at Bahiram in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.