चाकूने वार करीत ७० हजाराचा ऐवज लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:09 AM2021-01-02T04:09:06+5:302021-01-02T04:09:06+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर/पाटणसावंगी : टाेल टॅक्स भरून लघुशंकेसाठी राेडलगत थांबलेल्या कारचालकावर तिघांपैकी एकाने चाकूने वार केले. मदतीला कारमधील ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर/पाटणसावंगी : टाेल टॅक्स भरून लघुशंकेसाठी राेडलगत थांबलेल्या कारचालकावर तिघांपैकी एकाने चाकूने वार केले. मदतीला कारमधील पत्नी व मुलगा धावला असता, त्यांनाही चाकूचा धाक दाखवीत त्यांच्याकडील ७० हजार रुपये किमतीचा ऐवज हिसकावून घेत तिघांनीही पळ काढला. यात कारचालक गंभीर झाला असून, पाेलिसांनी तिघांपैकी एका आराेपीस अटक करण्यात यश मिळविले आहे. ही घटना सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सावनेर-नागपूर मार्गावरील पाटणसावंगी परिसरात बुधवारी (दि. ३०) मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
मोहम्मद रिजवान खान (४०, रा. टेका, नागपूर) असे जखमीचे तर भोला सुखदेव नागवंशी असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आराेपीचे नाव आहे. दिलीप नत्थूराम उईके (३१, रा. एकतानगर, परतवाडा, जिल्हा अमरावती) व राजकुमार इमरुतलाल पगारे (२१, रा. घोराडोंगरी, जिल्हा बैतूल, मध्य प्रदेश) अशी फरार आराेपींची नावे आहेत. माेहम्मद रिजवान खान, त्यांची पत्नी साहीन रिजवान खान (३०), मुले मोहम्मद रियाज खान (९) व मोहम्मद जोहरान खान (७) हे एमएच-३१/सीके-२३३१ क्रमांकाच्या कारने नागपूरहून छिंदवाडा (मध्य प्रदेश) येथे जात हाेते.
त्यांनी पाटणसावंगी शिवारातील टाेलनाक्यावर टाेल टॅक्स दिला आणि लघुशंकेसाठी जवळच कार थांबविली. त्यातच या तिघांनी त्यांच्यावर काठीने हल्ला चढविला. त्यामुळे साहीन व दाेन्ही मुले त्यांच्या मदतीला धावली. त्यातच एकाने त्यांच्या मुलाच्या गळ्यावर चाकू ठेवला तर दुसऱ्याने त्यांच्याकडील ४० हजार रुपये राेख व ३० हजार रुपयाचे साेन्याचे दागिने हिसकावून घेतले. याच धावपळीत तिसऱ्याने रिजवान यांच्या पाेट व चेहऱ्यावर चाकूने वार केले. ते जखमी हाेताच तिघांनीही सावनेरच्या दिशेने पळ काढला.
पत्नी व मुलांनी टाेलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना मदत मागितली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले व जखमी रिजवान यांना उपचारासाठी नागपूर येथील मेयाे रुग्णालयात भरती करण्याची व्यवस्था केली. यात पाेलिसांनी तिघांपैकी एका आराेपीस अटक केली आहे. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी भादंवि ३९४, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कामगिरी सहायक पाेलीस निरीक्षक निशांत फुलेकर व सतीश पाटील यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.
...
नाकाबंदी आणि सूचना
आराेपी सावनेरच्या दिशेने पळून गेल्याचे कळताच पाेलिसांनी या मार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी केली. त्यातच तिघे गुरुवारी (दि. ३१) पहाटेच्या सुमारास सावनेर परिसरातील पेट्राेलपंपाजवळ संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी सापळा रचला. मात्र, पाेलिसांची कुणकुण लागल्याने तिघांपैकी दाेघांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. यात भाेला सुखदेव पाेलिसांच्या हाती लागला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, साथीदारांची नावे सांगितली, अशी माहिती ठाणेदार अशाेक काेळी यांनी दिली. उर्वरित दाेन्ही आराेपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.