सैन्यदलात मेजर असल्याचे सांगून तरुणीला लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 11:37 AM2019-06-06T11:37:43+5:302019-06-06T11:38:58+5:30
सैन्यदलात मेजर म्हणून कार्यरत असल्याची थाप मारून लग्नासाठी इच्छूक असलेल्या एका तरुणीला गुजरातमधील एका ठगबाजाने जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने आधी ५० हजार रुपये तिच्याकडून उकळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सैन्यदलात मेजर म्हणून कार्यरत असल्याची थाप मारून लग्नासाठी इच्छूक असलेल्या एका तरुणीला गुजरातमधील एका ठगबाजाने जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने आधी ५० हजार रुपये तिच्याकडून उकळले. नंतर दोन लाख उकळण्याचा प्रयत्न केला. तरुणीला संशय आल्याने तिने चौकशी केली असता आरोपीची ठगबाजी उजेडात आली. त्यामुळे तिने प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. मोहित सिन्हा असे ठगबाजाचे नाव असून तो अहमदाबाद (गुजरात) मध्ये राहतो.
लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या प्रतापनगरातील प्रीती (वय ३२) हिने जीवनसाथी डॉट कॉमवर आपले प्रोफाईल अपलोड केले होते. तिला तेथे कथित मोहित सिन्हाचे प्रोफाईल दिसले. त्याने स्वत:ला सैन्यदलात मेजर असून हूज (गुजरात) मध्ये कार्यरत असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे प्रीतीने मोहितचा मोबाईल नंबर मिळवून त्याच्यासोबत चॅटिंग सुरू केले.
आरोपीने प्रीतीला आपल्याला आता पदोन्नती मिळणार असून, कामठीच्या मिलिट्री कॅम्पमध्ये बदली होणार असल्याचे सांगितले आणि तेथे बदली होताच आपण लग्न करू, अशी थाप मारली. १३ मे रोजी त्याचा अचानक तिला फोन आला. निवृत्त सैन्यदल अधिकारी रुषिक बोरा याचा अमरावतीला अपघात झाल्याने पैशाची आवश्यकता असल्याचे सांगून त्याना आपल्या बँक खात्यात तिला २५ हजार भरण्यास सांगितले. पुन्हा १४ मे रोजी २५ हजार जमा करण्यास भाग पाडले. त्यानंतर १६ मे रोजी मेसेज करून मित्राच्या मुलीचे आॅपरेशन करायचे आहे, असे सांगून तिला दोन लाख रुपये अरविंदसिंग बोहोता याच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले.
तीन दिवसात वेगवेगळे कारणं सांगून तो रक्कम जमा करण्यास सांगत असल्याने प्रीतीला संशय आला. त्यामुळे तिने आरोपीला फोन केला. मात्र, त्याचा मोबाईल सारखा बंद येत असल्याने त्याने फसवणूक केल्याचे प्रीतीच्या लक्षात आले. त्यामुळे तिने प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.