वडिलांकडून २० लाखांची खंडणी उकळण्याचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 01:27 AM2018-12-22T01:27:51+5:302018-12-22T01:28:56+5:30
स्वत:च्या अपहरणाचा कट रचून वडिलांकडून २० लाखांची खंडणी उकळण्याचा एका तरुणाचा डाव एमआयडीसी पोलिसांनी उघडा पाडला. पोलिसांनी ताब्यात घेताच त्या तरुणाने मित्रांसोबत मौजमजा करण्यासाठी आपणच आपल्या अपहरणाचा कट रचला होता, अशी कबुली दिली. परिणामी पोलिसांनी त्याला त्याच्या एका साथीदारासह अटक केली. तिसरा आरोपी फरार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वत:च्या अपहरणाचा कट रचून वडिलांकडून २० लाखांची खंडणी उकळण्याचा एका तरुणाचा डाव एमआयडीसी पोलिसांनी उघडा पाडला. पोलिसांनी ताब्यात घेताच त्या तरुणाने मित्रांसोबत मौजमजा करण्यासाठी आपणच आपल्या अपहरणाचा कट रचला होता, अशी कबुली दिली. परिणामी पोलिसांनी त्याला त्याच्या एका साथीदारासह अटक केली. तिसरा आरोपी फरार आहे.
गौरव प्रदीप दिनकर (वय २०) असे या कथित अपहरणकांडातील सूत्रधाराचे नाव आहे. त्याचे वडील प्रदीप रामकृष्ण दिनकर (वय ५१) शिक्षक असून ते वानाडोंगरीत राहतात. गौरव याने वैमानिकाशी संबंधित कामकाजाचे प्रशिक्षण घेतले आहे. या प्रशिक्षणानंतर संबंधित प्रशिक्षणार्थ्याला विमानतळावर वेगवेगळी जबाबदारी मिळते. मात्र गौरवला कोणतेच काम मिळाले नाही. त्यामुळे तो निराश झाला होता. त्याला मित्रांसोबत मौजमजा करण्याची सवय जडल्याने आणि पालकांकडून पाहिजे त्या प्रमाणात रक्कम मिळत नसल्याने गौरव अस्वस्थ होता. झटपट मोठी रक्कम मिळवण्यासाठी काय करावे, असा त्याच्यासमोर प्रश्न होता. त्याचा मित्र आरोपी सागर विक्रम बग्गा (वय २३) हा भामटी परसोडीत राहतो. तो टॅक्सीचालक आहे तर, दुसरा एक आरोपी राजू हरडे प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतो. या दोघांसमोर त्याने झटपट लाखोंची रक्कम मिळवण्यासाठी स्वत:च्या अपहरणाचा कट बोलून दाखवला. माझ्या वडिलांना फोन करून तुम्ही २० लाखांची खंडणी मागा, रक्कम मिळताच ती आपण समप्रमाणात वाटून घेऊ आणि नंतर मौजमजा करू. वडील पोलिसांकडे जाणार नाही, अशी हमीही त्याने आरोपी सागर आणि राजूला कटकारस्थानात सहभागी करून घेताना दिली. त्यानुसार, गुरुवारी दुपारी गौरव, सागर आणि राजू तिघेही वानाडोंगरीतून बाहेर पडले. दुपारी १ वाजता आरोपीने गौरवच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन केला. ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात असून तो सुखरूप हवा असेल तर २० लाख रुपये खंडणी द्या. पोलिसांना सांगितल्यास गौरवला ठार मारू’, अशी धमकीही आरोपींनी दिली. या फोनमुळे घाबरलेल्या दिनकर यांनी लगेच एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेतली. २० लाखांच्या खंडणीसाठी शिक्षकाच्या मुलाचे अपहरण झाल्याचे कळताच ठाणेदार भारत क्षीरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपींना शोधण्यासाठी धावपळ सुरू केली.
त्यानुसार, खंडणीची रक्कम कुठे आणून द्यायची, असे सांगणारा दुसरा फोन येताच दिनकर यांनी मुलाला काही करू नका, आपण रक्कम द्यायला तयार आहोत, असे सांगितले. त्यानंतर एका बॅगमध्ये रक्कम घेऊन दिनकर आरोपी सांगत असलेल्या ठिकाणावर जाऊ लागले. दुपारपासून रात्री ७ वाजेपर्यंत आरोपी प्रतापनगर, खामला, सीताबर्डीसह ठिकठिकाणी दिनकर यांना बोलवत होते. पोलीस मागावर असल्याचा संशय आला म्हणून की काय ते स्वत: त्या ठिकाणी रक्कम घ्यायला येत नव्हते. अखेर ७ वाजता गौरवचाच फोन वडिलांना आला. आपले अपहरण करणाºयांनी रेल्वेस्थानकावर सोडल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे दिनकर यांनी रेल्वेस्थानकाजवळ जाऊन त्याला सोबत आणले. गौरव मिळताच त्याला एमआयडीसी ठाण्यात आणण्यात आले. त्याचे संशयास्पद वर्तन आणि तो वारंवार अपहरणाची विसंगत माहिती देत असल्यामुळे पोलिसांनी त्याला आपल्या भाषेत विचारणा केली. प्राथमिक चौकशीतच गौरवने अपहरण झालेच नाही, आपणच वडिलांकडून रक्कम काढण्यासाठी हा डाव टाकला होता, असे कबूल केले. या डावबाजीत सागर बग्गा आणि राजू हरडे सहआरोपी असल्याचेही त्याने कबूल केले. त्यानुसार, पोलिसांनी गौरव आणि सागरला अटक केली. राजू फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पैसे मिळण्याचा होता विश्वास !
स्वत:च्या वडिलांकडून रक्कम उकळण्यासाठी कथित अपहरणाचा डाव रचणारा गौरव याला खंडणीची रक्कम वडिलांकडून हमखास मिळेल, वडील पोलिसांकडे जाणार नाही, असा विश्वास होता. त्यामुळे तो गणेश टेकडी परिसरात बसून रकमेची वाट बघत होता. मात्र, त्याचे वडील पोलिसांकडे गेल्याने त्याच्या कटकारस्थानावर पाणी फेरले गेले. एका कथित अपहरणाचा कट उधळून आरोपींना अटक करण्याची कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी मारूती शिंदे यांच्या नेतृत्वात ठाणेदार भारत क्षीरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बजावली.