मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देतो असे सांगितले आणि....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 11:38 AM2020-07-11T11:38:22+5:302020-07-11T11:39:19+5:30
एका हवालदिल पित्याला मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत मिळवून देतो, असे आश्वासन देऊन एका भामट्याने त्यांच्याकडून १ लाख २५ हजार रुपये हडपले. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आजारी मुलाच्या उपचारासाठी इकडे तिकडे फिरणाऱ्या एका हवालदिल पित्याला मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत मिळवून देतो, असे आश्वासन देऊन एका भामट्याने त्यांच्याकडून १ लाख २५ हजार रुपये हडपले. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे.
फिर्यादी रमेश हिरामण अढाऊकर (वय ५७) हे अकोला जिल्ह्यातील छोटी उमरी येथील रहिवासी आहेत. त्यांचा मुलगा अनेक दिवसापासून आजारी आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठी ते मेडिकल चौकातील एका खासगी इस्पितळात आलेले होते. महागड्या उपचाराने आर्थिक कोंडी झाल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी त्यांनी अनेकांकडे विचारणा चालविलेली होती. २४ जूनला दुपारी त्यांना सुशील पुरी नावाचा एक भामटा भेटला. त्याने अढाऊकर यांची विचारपूस करून त्यांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून उपचारासाठी मदत मिळवून देतो, असे आश्वासन दिले. त्यानंतर अढाऊकर यांच्याकडून वेगवेगळी कागदपत्रे घेतली आणि वेगवेगळे कारण सांगून त्यांच्याकडून १ लाख, २५ हजार रुपये घेतले. त्यानंतर आरोपी पळून गेला. मुलाच्या आजारपणामुळे आधीच हवालदिल असलेल्या अढाऊकर यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी बरीच पायपीट केली. मात्र तो सापडला नाही. त्यामुळे त्यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणी गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.