तो म्हणाला, काही काम असेल तर सांग... तिने दिले भलतेच काम!
By नरेश डोंगरे | Published: June 8, 2024 12:47 PM2024-06-08T12:47:59+5:302024-06-08T12:51:47+5:30
आरोपींकडून धक्कादायक खुलासा : म्हणे, ओळख झाली अन् बाळाच्या अपहरणाची सुपारी घेतली
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ओळख झाल्यानंतर तो तिला म्हणाला, माझ्यालायक काही काम असेल तर सांग. तिने लगेच त्याला काम दिले. मात्र, काम असे काही होते की आज त्या कामाचे स्वरूप उघड झाल्यानंतर पोलिसांच्याही भूवयां उंचावल्या. या प्रकरणात मुख्य आरोपीकडून झालेला खुलासा मोठा धक्कादायक आहे. त्यानुसार, परप्रांतिय महिलेची काही दिवसांपूर्वी ओळख झाली अन् तिच्याकडून आपल्याला सहा महिन्यांच्या चिमुकल्याच्या अपहरणाचे काम (सुपारी) मिळाले, असे मुख्य आरोपीने सांगितल्याचे समजते.
आरोपी सुनील रुढे हा यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहे. जेमतेम शिकलेला सुनीलचे वाकचातुर्य त्याच्यातील थंड डोक्याच्या गुन्हेगाराची कल्पना देणारे ठरावे. दोन वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील मायासोबत कुठल्याशा एका कार्यक्रमात त्याची ओळख झाली म्हणे. तेव्हापासून ते जवळ आले आणि नंतर रिलेशनशिपमध्ये राहू लागले. कामधंदा करून जीवन जगण्याऐवजी कमी वेळेत, कमी श्रमात मोठी रक्कम हातात पडावी, अशी त्या दोघांचीही मानसिकता. त्यामुळे एका ठिकाणी राहण्याऐवजी ते नेहमीच सावज हेरण्यासाठी ईकडे तिकडे भटकंती करतात. अशाच प्रकारे आंध्र-तेलंगणात भटकंती करताना सुनील एका प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला होता. त्या प्रकरणाच्या तारखेवर तो कोर्टात कधीबधी पेशीवर जायचा. त्याच ठिकाणी एका गुन्ह्यातील आरोपी सुजाताही तारखेवर यायची. येथे सुनील आणि सुजाताची ओळख झाली. दोघेही गुन्हेगारी वृत्तीचे. त्यामुळे गट्टी जमली. काही दिवसांपूर्वी त्याने तिला 'आपल्यालायक काही काम असेल तर सांग', असे म्हटले. सुजाताने त्याला लगेच काम सांगितले. कमी वेळेत चांगले पैसे मिळतील, अशीही हमी दिली. काम होते चिमुकल्याच्या अपहरणाचे, त्यासाठी पैसे मिळणार होते, ४० ते ५० हजार !
भाव-भावना, संवेदनाशी कवडीचा संबंध नसलेला आरोपी सुनील तयार झाला. सोबत त्याची प्रेयसी माया होतीच. या दोघांनी बुधवारी सावज हेरले आणि गुरूवारी सहा महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरणही केले. बाळाला तातडीने आसिफाबादला (तेलंगणा) सुजाताच्या हातात द्यायचे, रोकड घ्यायची अन् नमस्ते लंडन म्हणत तिचा टाटा बायबाय करायचा, अशी त्याची योजना होती. त्यामुळे त्याने येथून आसिफाबादला जाण्यासाठी ६५०० रुपयांत कॅब केली. बाळ चोरल्यापासून तो आसिफाबादला जाईपर्यंत तो सुजाताच्या संपर्कात होता. पहाटेच्या अंधारात आपल्याला कुणी बघितले नाही, आपल्याला कुणी ओळखत नाही, त्यामुळे पकडले जाऊ, अशी कसलीही भीती सुनील-मायाच्या मनात नव्हती. मात्र, पुलीस के हाथ बहोत लंबे होते है (अन् पुलीस की पहोंच दूर तक होती है!) हे ते विसरूनच गेले होते. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी आधीच सीसीटीव्ही फुटेजसह आरोपींची माहिती, मोबाईल नंबर दिल्यामुळे टॅक्सीतून उतरून ऑटोतून बाळाला घेऊन सुजाताकडे जात असतानाच मंचेरिया (तेलंगणा) पोलिसांनी त्यांना नाकेबंदीत रोखले अन् ताब्यात घेतले.
आंध्र, तेलंगणात कोणते गुन्हे ?
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आपणापर्यंत पोलीस पोहचलेच कसे, असा प्रश्न त्यांना पडला. थोडासा पाहुणचार मिळाल्यानंतर सुनील, मायाने पोलिसांकडे सुजाताचे तर सुजाताने चवथी आरोपी विजयाचे नाव सांगितले. त्यानंतर मात्र त्यांनी पोलिसांना दिशाभूल करण्याची भूमिका अवलंबिली आहे. ते तोंड उघडायला तयार नाहीत. मात्र, त्यांचे एकूणच वर्तन बघता हे अट्टल गुन्हेगार असावे, त्यांचे रॅकेट असावे आणि त्यानी यापूर्वही असेच अनेक गुन्हे केले असावे, असा पोलिसांचा संशय आहे. आंध्र, तेलंगणामध्ये त्यांच्यावर नेमके कोणते गुन्हे दाखल आहेत, त्याचाही पीसीआरमधून उलगडा करण्याची पोलिसांची योजना आहे.