म्हणे मेळघाटात कुपोषणामुळे एकही मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:11 AM2021-08-27T04:11:41+5:302021-08-27T04:11:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेळघाटमध्ये मागील पाच वर्षांत कुपोषणामुळे एकाही लहान मुलाचा मृत्यू झालेला नाही, असा दावा अमरावतीच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेळघाटमध्ये मागील पाच वर्षांत कुपोषणामुळे एकाही लहान मुलाचा मृत्यू झालेला नाही, असा दावा अमरावतीच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आला आहे. या कालावधीत चौदाशेहून अधिक अर्भक व बालमृत्यू झाले. या मृत्यूंचे नेमके कारण काय याचे उत्तर कोण देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत आदिवासी विकास विभागाकडे विचारणा केली होती. २०१७ पासून मेळघाटात किती अर्भक, बालमृत्यू झाले, कुपोषणामुळे किती मृत्यू झाले आदी प्रश्न त्यांनी विचारले होते. मेळघाट क्षेत्र हे ३२३ गावांनी बनले असून, तेथील लोकसंख्या ३ लाख ३ हजार ४८० इतकी आहे. त्यातील २ लाख ३५ हजार २४१ नागरिक आदिवासी आहेत. अमरावतीच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार मार्च २०१७ ते ३१ मे २०२१ या कालावधीत १ हजार ४४९ बाल व अर्भक मृत्यू झाले. यात ० ते २८ दिवसांच्या वयोगटातील नवजात बाळांची संख्या ७४२ इतकी होती, तर ४३२ अर्भकांचा मृत्यू झाला. १ ते ६ या वयोगटातील ३४५ बालकांचा मृत्यू झाला. यातील एकही मृत्यू कुपोषणामुळे झालेला नसून, सर्व मृत्यू विविध आजारांमुळे झाले, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. कुपोषण आटोक्यात आणण्याचा दावा प्रशासन करीत असले तरी या मोठ्या प्रमाणातील बालमृत्यूंमुळे योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
वर्ष-अर्भक मृत्यू - नवजात अर्भक मृत्यू (० ते २८ दिवस)-बालमृत्यू (१ ते ६ वर्ष)
मार्च २०१७ - १६० - १२० - १२७
मार्च २०१८ - १५१ - ६६ - ५१
मार्च २०१९ - १४४ - १०१ - ६४
मार्च २०२० - १२२ - ७४ - ५०
मार्च २०२१ - १५५ - ५७ - ४१
मे २०२१ - १० - १४ - १२