खुर्चीवर बसवून हात बांधले अन् गळ्यावर शस्त्राने घाव घातले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:08 AM2021-03-10T04:08:30+5:302021-03-10T04:08:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हेल्थ केअर प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपनीच्या एका ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लक्ष्मण रामलाल मलिक (वय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हेल्थ केअर प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपनीच्या एका ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लक्ष्मण रामलाल मलिक (वय अंदाजे ६५) नामक वृद्धाची गळा चिरून अज्ञात आरोपीने निर्घृण हत्या केली. मंगळवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकाजवळ रजत संकुल ही बहुमजली इमारत आहे. इमारतीच्या पहिल्या माळ्यावर १०३ क्रमांकाच्या सदनिकेत हेल्थ केअर प्रॉडक्ट विकणाऱ्या दादाजी सरोदे यांचे ऑफिस आहे. मलिक तेथे काम करीत होता. मलिक मूळचा जरीपटका येथील रहिवासी असून, सरोदे मित्र असल्याने मलिक ऑफिस बंद झाल्यानंतर तेथेच राहायचा. नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी ऑफिसचे कर्मचारी निघून गेल्यानंतर मलिक तेथे थांबला. आज सकाळी १०.१५ च्या सुमारास ऑफिस उघडायला कर्मचारी आले तेव्हा खुर्चीत बसलेल्या अवस्थेत मलिक रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. त्याचे हात मागे बांधून होते आणि गळ्यावर कैची किंवा पेचकससारख्या शस्त्राचे वार केल्याच्या खुणा होत्या. खाली रक्ताचे थारोळे साचले होते. कर्मचाऱ्यांनी ही माहिती गणेशपेठ पोलिसांना कळविली. गणेशपेठ पोलिसांचा ताफा तसेच पोलीस उपायुक्त लोहित मतानी आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी इमारतीतील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले. ठसेतज्ज्ञ आणि श्वान पथकही घटनास्थळी बोलावून घेण्यात आले.
---
गुंगीचा पदार्थ खाऊ घालून हत्या?
मलिकची जेथे हत्या झाली त्या ठिकाणी पोलिसांना पेढ्याचा डबा तसेच अंगूर आढळले. त्यामुळे मारेकऱ्याने आधी त्याला गुंगीचे औषध खाऊ घालून हतबल केले असावे. नंतर खुर्चीवर बसलेल्या अवस्थेत त्याचे हात मागे ओढून करकचून बांधले असावे आणि त्यानंतर त्याची हत्या केली असावी, असा संशयवजा अंदाज आहे. मलिक धडधाकट शरीरयष्टीचा होता. त्यामुळे ही हत्या एकापेक्षा अधिक आरोपींनी केली असावी, असाही संशय आहे. पोलिसांनी दिवसभरात पाच ते सात संशयितांची चौकशी केली. मात्र, रात्रीपर्यंत त्यांच्यापैकी कुणाचा या हत्याकांडात हात आहे का, त्याबाबतचा निष्कर्ष निघाला नव्हता.
----
चार बायकोंचा दादला
आरोपींचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी मलिकच्या नातेवाईकांना बोलाविले. त्यांच्याकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मलिक चार बायकांचा दादला होता. त्याची एक पत्नी हुडको कॉलनी, दुसरी नारी, तिसरी मानेवाडा तर चौथी पत्नी धरमपेठेत राहत असल्याचे पोलीस सांगतात. त्याची शेवटची बायको २८ वर्षांची असून, तिला अडीच वर्षांचा मुलगा आहे.
---
नोकरीच्या नावाखाली घेतली रक्कम
त्याने अनुकंपा तत्त्वानुसार वडिलांच्या नावावर पत्नीला तर स्वत:च्या नावावर मुलाला नोकरी लावली होती. त्यानंतर मलिकने काही जणांना नोकरीचे आमिष दाखवून एकाकडून आठ तर दुसऱ्याकडून १५ लाख रुपये घेतले होते, अशीही माहिती पुढे आली आहे. हत्येमागे हे कारण आहे का, त्याचाही पोलीस तपास करीत आहेत.
----
वरिष्ठांचे पोलीस ठाण्यात ठाण
वृत्त लिहिस्तोवर हत्या करणारे आणि हत्येचे कारण स्पष्ट झाले नव्हते. जेथे मलिकची हत्या झाली ते ऑफिस मलिकच्या मित्राचे आहे. पूर्वी मलिक एका इस्पितळात सफाईचे काम करायचा. महिनाभरापासून तो या ऑफिसची साफसफाई करून तेथेच राहत होता. त्याची हत्या कौटुंबिक कारणामुळे झाली, नोकरीच्या नावाखाली पैसे घेतल्यामुळे झाली की आणखी तिसरे कोणते कारण आहे, ते शोधून काढण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त लोहित मतानी यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात रात्रीपर्यंत ठाण मांडले होते. ठाणेदार भारत क्षीरसागर यांच्याकडून त्यांनी दिवसभरातील घडामोडींची माहिती जाणून घेत, हत्येचा छडा लावण्यासाठी वेगवेगळी पथके कामी लावली.