जिगरबाज! जिवाची पर्वा न करता रेल्वेगार्डने वाचवला वृद्ध प्रवाशाचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 07:05 PM2021-04-29T19:05:00+5:302021-04-29T19:06:34+5:30
Nagpur News मध्य रेल्वेच्या वांगणी स्टेशनवर लहान मुलाचा जीव वाचवणाऱ्या मयूर शेळकेच्या बहादुरीची पुनरावृत्ती नागपूर जिल्ह्यातल्या कामठी रेल्वेस्थानकावर गुरुवारी सकाळी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मध्य रेल्वेच्या वांगणी स्टेशनवर लहान मुलाचा जीव वाचवणाऱ्या मयूर शेळकेच्या बहादुरीची पुनरावृत्ती नागपूर जिल्ह्यातल्या कामठी रेल्वेस्थानकावर गुरुवारी सकाळी घडली.
एका वृद्ध प्रवाशाचा तोल जाऊन ते रेल्वेखाली येण्याआधीच तेथील रेल्वे गार्ड इशांत दीक्षित यांनी धावत जाऊन त्यांना सावरले.
पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना गुरुवारी सकाळी ९.५५ वाजता कामठी रेल्वेस्थानकावर घडली.
रेल्वे गार्ड वी.जे. जनवारे व ईशांत दिक्षित हे कामठी रेल्वे स्टेशनच्या प्लेटफार्म क्रमांक २ वर डयुटी बजावित होते. त्यावेळी सकाळी ९.५३ ला महाराष्ट्र एक्सप्रेस प्लेटफार्म क्र.२ वर आली. तिथे उभे असलेले वृद्ध प्रवाशी दुर्गा प्रसाद छोटेलाल सराफ (६८) रा. लालाओळी, कामठी हे त्यांचे साहित्य गाडीत चढवित होते. तेवढयातच गाडी सुरु झाली. सराफ यांच्याजवळ साहित्य जास्त असल्याने ते वेळेत बोगीत ठेवू शकले नाही. अशात गाडी सुरु होताच तातडीने बोगीत चढताना त्यांचा पाय स्लीप झाला आणि रेल्वे ट्रॅकवर तोल गेला. ते गाडी खाली येत असल्याचे दिसताच तिथे उपस्थित ईशांत दिक्षित यांनी धाव घेत सराफ यांना तातडीने वर खेचले. सराफ हे शेगाव येथे जात होत. सराफ यांना सोडणाºया त्यांचे मित्र सुर्यकांत शर्मा रा. लालाओळी कामठी हेही घटनेच्यावेळी प्लॅटफार्मवर उपस्थित होते. दिक्षीत यांनी जीवाची पर्वा न करता सराफ यांचे प्राण वाचविल्याबद्दत त्यांनी आभार व्यक्त केले.