महागड्या कोचिंग क्लास नव्हे तर सेल्फ स्टडी करून 'यूपीएससी'त मिळवली ३०० वी रैंक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 13:19 IST2025-04-23T13:19:32+5:302025-04-23T13:19:53+5:30
सरकारी नोकरी सोडून केला अभ्यास : दोन वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रात दिली सेवा

He secured 300th rank in UPSC by self-study, not expensive coaching classes.
सुरेंद्र राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रयत्नात सातत्य आणि निष्ठा ठेवली तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे यवतमाळातील डॉ. जयकुमार शंकर आडे यांनी सिद्ध केले आहे. दोन वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा दिल्यानंतर त्यांनी घरूनच यूपीएससीची तयारी सुरू केली. यासाठी कोणताही कोचिंग क्लास जॉईन केला नाही. तर ऑनलाइनद्वारे केवळ सेल्फ स्टडीच्या भरवशावर तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससीमध्ये देशात ३०० रैंक मिळवली. डॉ. जयकुमार शंकर आडे यांनी बीजे मेडिकल कॉलेज पुणे येथून वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर दोन वर्षे स्वतःच्या तालुक्यातील बोरगाव ता. नेर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा दिली.
वडिलांचे मूळ गाव सोनवाढोणा ता. नेर असल्याने गावात सेवा देण्याची संधी डॉ. जयकुमार यांच्याकडे होती. मात्र त्यांना याही पुढे जाऊन आपण काही करावे, असं सारखं वाटत होतं. त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शरीररचनाशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. तेथेच राहून त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. अनेकांनी त्यांना घरून यूपीएससी होऊच शकत नाही, असे सांगितले. मात्र त्यांचा निर्धार पक्का होता. सुरुवातीला ऑनलाइनद्वारे यूपीएससीचा अभ्यासक्रम समजून घेतला. नंतर स्वतःच नोट्स तयार करत त्याचे अध्ययन केले. डॉ. जयकुमार यांना पहिल्या दोन प्रयत्नात यश मिळाले नाही. मात्र यातून त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला, आपण यशाच्या जवळ आहोत असं सारखं वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. अभ्यासात सातत्य ठेवल्याने तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश मिळाले. आत त्यांची ३०० वी रैंक आल्याने ते आयपीएस म्हणून निवडले जाणार असल्याचे सांगण्यात येते. जयकुमार यांचे वडील शंकर आडे हे शिक्षक असून ते लासिना जिल्हा परिषद शाळेवर आहेत. आई निरुपमा शंकर आडे या गृहिणी आहे.