७० लाख रुपये घेऊन कंपनीची मालमत्ता दुसऱ्याला विकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:08 AM2021-04-28T04:08:13+5:302021-04-28T04:08:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कंपनीच्या मालमत्तेच्या विक्रीचा करार करून ७० लाख रुपये घेतल्यानंतर ती जागा परस्पर दुसऱ्याला विकून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कंपनीच्या मालमत्तेच्या विक्रीचा करार करून ७० लाख रुपये घेतल्यानंतर ती जागा परस्पर दुसऱ्याला विकून फसवणूक करणाऱ्या आरोपी गोपाल लक्ष्मणराव कोंडावार (वय ५५, रा. रामदासपेठ) याच्याविरुद्ध मंगळवारी अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मनमोहन तिलकराज हिंगल ( वय ६४) असे तक्रारकर्त्याचे नाव असून ते रामदास पेठेत राहतात. आरोपी कोंडावार आणि हिंगल यांची जुनी ओळख आहे. कोंडावारची एक कंपनी असून या कंपनीची मालमत्ता विकण्याचा करार २०१२ मध्ये आरोपी कोंडावारने हिंगल यांच्यासोबत केला होता. कंपनीच्या संचालक मंडळाचा ठराव करूनच ही मालमत्ता विकत असल्याचे कोंडावारने हिंगल यांना सांगितले होते आणि त्या ठरावाची प्रतही त्यावेळी हिंगल यांना दिली होती. त्यावर विश्वास ठेवून हिंगल यांनी कोंडावारला ७० लाख रुपये चेकने दिले. ही रक्कम घेतल्यानंतर आरोपी कोंडावारने त्याच्या कंपनीची मालमत्ता परस्पर दुसऱ्याला विकली. या वादग्रस्त व्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कोंडावारला बरेचदा विचारणा केली. मात्र ९ वर्षापासून कोंडावार त्यासंबंधाने असंबद्ध माहिती देऊन फिर्यादीला टाळत होता. अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून प्रदीर्घ चौकशी झाल्यानंतर या प्रकरणात मंगळवारी अंबाझरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
---