१२ वर्षीय मुलीच्या गळ्याला चाकू लावून मागितली ५० लाखांची खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 10:29 AM2021-07-03T10:29:41+5:302021-07-03T10:42:42+5:30
ऑटोमोबाईल शॉपच्या मालकाच्या १२ वर्षीय मुलीचे हातपाय बांधून तिच्या गळ्याला चाकू लावून तीन भामट्यांनी ५० लाखांची खंडणी मागितली. रक्कम आणून दिली नाही तर कुटुंबीयांना संपवू, अशी धमकीही दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑटोमोबाईल शॉपच्या मालकाच्या १२ वर्षीय मुलीचे हातपाय बांधून तिच्या गळ्याला चाकू लावून तीन भामट्यांनी ५० लाखांची खंडणी मागितली. रक्कम आणून दिली नाही तर कुटुंबीयांना संपवू, अशी धमकीही दिली. या प्रकारामुळे प्रचंड दहशतीत आलेली मुलगी विचित्र वर्तन करत असल्याचे पाहून अखेर घरच्यांनी तिला बोलते केले आणि तब्बल १२ दिवसांनी ही धक्कादायक घटना उजेडात आली. पाचपावली पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपीसह दोघांना ताब्यात घेतले आहे.
मोहम्मद नईम अशरफ अब्दुल जब्बार (वय ४२) हे पाचपावलीतील सिद्धार्थनगरात राहतात. त्यांचे गंगाबाई घाट मार्गावर ऑटोमोबाइल्स शॉप आहे. आर्थिक स्थिती चांगली असलेल्या नईम यांच्याकडे पक्षांना दाणे टाकण्यासाठी एक १७ वर्षीय नोकर होता. महिनाभर काम करून त्याने तेथून काम सोडले. नईम यांची आर्थिक स्थिती भक्कम असून घरात मोठ्या प्रमाणात रोख आणि दागिने असते, याची त्याला कल्पना आली होती. त्यामुळे त्याने आपल्या दोन साथीदारांसह नईम यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा कट रचला.
नईम यांची १२ वर्षीय मुलगी रिदा फातिमा आपल्या निवासस्थानापासून एका इमारतीपलीकडे रोज रात्री मेहंदी क्लासला जाते. १९ जूनच्या रात्री ८.३० वाजता ती मेहंदी क्लास संपवून घरी परत जात असताना अल्पवयीन आरोपी तसेच मोहम्मद जाहिद मोहम्मद राजिक (वय २२, रा. वांजरा) आणि अन्य एका साथीदाराने तिला घराच्या बाजूला असलेल्या कारमागे ओढत नेले. तेथे तिचे हातपाय बांधले आणि गळ्याला चाकू लावला. तुझ्या घरी मोठ्या प्रमाणात रक्कम आणि दागिने आहेत. आम्हाला चूपचाप ५० लाख रुपये आणून दे, अन्यथा तुझ्या आईवडील आणि भावाला जीवे मारू, अशी धमकी दिली. याबाबत कुणाला काही सांगितले तर गंभीर परिणाम होतील, असेही आरोपींनी म्हटले. त्यानंतर आरोपी पळून गेले.
अखेर तिचा बांध फुटला
आरोपींनी केलेली मागणी पूर्ण केली नाही आणि त्याबाबत कुणाकडे वाच्यता केली तर आपल्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका होईल, असा धाक मनात बसल्याने रिदा कमालीची हादरली होती. २५ जूनपर्यंत तिचे वर्तन कळण्यापलीकडे होते. ती घरात विचित्र वर्तन करू लागल्याने घरची मंडळी अस्वस्थ झाली. त्यांनी तिला विश्वासात घेऊन बोलते केले. तब्बल १२ दिवस कोंडमारा सहन केल्यानंतर अखेर गुरुवारी तिच्या भावनांचा बांध फुटला. तिने वडिलांना बिलगून रडत रडत घडलेला प्रकार सांगितला. ते ऐकून नईम आणि त्यांचे कुटुंबीयही हादरले.
पोलिसांकडे धाव, गुन्हेगार जेरबंद
नातेवाईक आणि मित्रमंडळींशी चर्चा केल्यानंतर नईम यांनी या प्रकरणाची तक्रार गुरुवारी पाचपावली पोलिसांकडे नोंदवली. ठाणेदार संजय मेंढे, द्वितीय निरीक्षक रवी नागोसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेत लगेच गुन्हा दाखल केला. धावपळ करून मुख्य अल्पवयीन आरोपी आणि मोहम्मद जाहिद नामक आरोपीच्या गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी मुसक्या बांधल्या. त्यांचा तिसरा साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
---